(अतिक्रमणाचे संग्रहित छायाचित्र) 
मुंबई

विशाळगड, पायथ्याशी असणारे अतिक्रमण हटवा

महसूलमंत्री बावनकुळे यांचे जिल्हाधिकार्‍यांना आदेश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : विशाळगडावर आणि गडाच्या पायथ्याशी असलेली सर्व अतिक्रमणे तत्काळ काढून टाका, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले. त्यावर महिनाभरात अतिक्रमणे हटवली जातील, असे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.विशाळगड मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक व हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी बुधवारी मंत्रालयात मंत्री बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी अतिक्रमणे हटवण्याबाबत निवेदन दिले. त्यावर बावनकुळे यांनी हे आदेश दिले.

विशाळगडावरील अतिक्रमणांचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून गाजत आहे. गतवर्षी 14 जुलै रोजी विशाळगड मुक्ती आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यातून विशाळगडाशेजारील मुसलमानवाडीत दंगल उसळली. दगडफेक, नासधूस, जाळपोळ झाली. यानंतर संपूर्ण जिल्ह्यासह राज्यातही अनेक दिवस वातावरण तणावपूर्ण झाले होते. जिल्हा प्रशासनाने संपूर्ण गडासह परिसरात संचारबंदी लागू केली होती. यानंतर स्थानिक नागरिक वगळता अन्य भाविक, पर्यटकांना गडावर प्रवेशबंदी केली होती. तब्बल 175 दिवसांनी ही बंदी उठवून सध्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेतच पर्यटक, भाविकांना प्रवेश देण्यात येत आहे.

दरम्यान, विशाळगडावर झालेल्या दंगलीनंतर दुसर्‍याच दिवसापासून दि. 15 जुलैपासून अतिक्रमण काढण्यास प्रशासनाने सुरुवात केली. सुमारे चार दिवस ही कारवाई सुरू होती. या कारवाईत गडावरील सुमारे 90 अतिक्रमणे प्रशासनाने हटवली. दरम्यान, अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान काहीजणांनी उच्च न्यायालयात त्याला आव्हान दिले. त्यावर न्यायालयाने पावसाळा संपेपर्यंत निवासी अतिक्रमणे काढू नका, त्यानंतर कारवाई करा, असे आदेश दिले होते. विशाळगड आणि पायथ्याशी 157 अतिक्रमणे आहेत. ती काढण्यासाठी राज्य शासनाने निधीही वर्ग केला आहे. जिल्हा प्रशासनाने 90 अतिक्रमणे काढली. मात्र, दर्ग्यावरील बांधलेले बेकायदेशीर बांधकाम, त्याच्या भोवतलची बांधकामे व गडाच्या पायथ्याशी झालेली बेकायदेशीर बांधकामे अद्याप हटवलेली नाहीत. याप्रकरणी न्यायालयाचा आदेश पावसाळ्यापर्यंत होता, आता पावसाळा संपून हिवाळाही संपत आला आहे. तरीही प्रशासन उर्वरित अतिक्रमणे हटवत नाहीत. याबाबत कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले, तरीही प्रशासन काहीही कार्यवाही करत नाही. यामुळे कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांना अतिक्रमण काढण्याची कार्यवाही तत्काळ सुरू करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी विनंती शिंदे यांनी केली.

त्यावर महसूलमंत्री बावनकुळे यांनी जिल्हाधिकार्‍यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही सुरू करा, असे आदेश त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले. त्यावर महिन्याभरात विशाळगडावरील उर्वरित सर्व अतिक्रमणे हटवली जातील, असे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केल्याचे शिंदे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT