नवी मुंबई : युद्धजन्य परिस्थितीमुळे भडकलेल्या महागाईला मिरचीने तडका दिला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाळवलेल्या लाल मिरचीचे भाव किलोमागे शंभर ते तीनशे रुपयांनी वाढले आहेत.
कर्नाटक बेडगी, काश्मिरी मिरची 200 ते 300 रुपये किलोमागे महागली असून, आंध्र प्रदेशातील तेजा जातीच्या मिरचीचे दर 100 ते 120 रुपयांनी वाढले आहेत. मुंबईकरांची तेजा, बेडगी आणि काश्मिरी जातीच्या मिरचीला अधिक मागणी आहे. मुंबईत मार्च ते एप्रिल महिन्यात मसाले बनवण्यासाठी लगबगही सुरू झाली असल्याने, मिरचीच्या मागणीत घाऊक बाजारात वाढ झाली आहे. मागणीनुसार पुढे मिरचीचे दर वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती घाऊक मिरची व्यापारी अमरीश बारोट यांनी पुढारीशी बोलताना दिली.
उन्हाळा सुरू झाला की अनेक महिला लाल मसाला तयार करण्याच्या तयारीला लागतात. यावर्षी अगदी जानेवारीपासूनच लाल मिरचीचा ठसका वाढला होता. सुक्या मसाल्याच्या लाल मिरच्यांच्या दरात घाऊक बाजारातच यावर्षी मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कर्नाटकची बेडगी गेल्या वर्षी 150 ते 225 रूपये किलो होती. ती यावर्षी 380 ते 420 रुपये किलोपर्यंत पोहोचली. कर्नाटक मिरचीची दुसरी जात काश्मिरी गेल्या वर्षी 400 ते 550 रुपये किलो होती. यंदाच्या हंगामात तिने चांगलाच ठसका दिला असून 650 ते 800 रुपये किलोपर्यंत मजल मारली आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील तेजा आणि तिख्खा गुंटूर जातीच्या मिरचीचे दर 100 ते 120 होते, ते तेजा 230 ते 250 आणि गुंटूर 260 रुपये किलोने एपीएमसी घाऊक बाजारात विकली जात आहे.