मुंबई : राज्यात अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रासाठी यंदाचे शैक्षणिक वर्ष अभूतपूर्व ठरले आहे. गेल्या काही वर्षांपेक्षा 2025-26 या प्रवेश हंगामात अभियांत्रिकी पुन्हा एकदा तरुणाईचे आकर्षणकेंद्र ठरले आहे. यंदा उपलब्ध असलेल्या 2 लाख 2 हजार 883 जागांपैकी तब्बल 1 लाख 66 हजार 746 जागा भरल्या आहेत. गेल्या वर्षी ही संख्या 1 लाख 49 हजार 78 इतकीच होती. यंदा जागावाढ असली तरी जवळपास 17 हजार 700हून अधिक विद्यार्थ्यांनी गतवर्षीच्या तुलनेत अभियांत्रिकीला पसंती दिली आहे.
राज्यभरातून यंदा 2 लाख 22 हजार 402 विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी पदवीसाठी अर्ज दाखल केले होते. केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेच्या चार फेरीत 1 लाख 30 हजार 408 विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवला. याशिवाय संस्था स्तरावरील (आयएल) व अतिरिक्त केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेत एकत्रितपणे 36 हजार 332 प्रवेश घेण्यात आले. यामुळे अभियांत्रिकी क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
यंदा विद्यार्थ्यांची पसंती स्पष्टपणे कॉम्प्यूटर इंजिनीरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शाखांकडे वळली आहे. कॉम्प्यूटर इंजिनीरिंगमध्ये 32 हजार 245 जागा उपलब्ध होत्या, त्यापैकी 27 हजार 995 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शाखेत 15 हजार 187 विद्यार्थी प्रवेशित झाले.
याशिवाय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स , मशिन लर्निंग, डेटा सायन्स आणि सायबर सिक्युरिटी या नव्या युगातील शाखांत उपलब्ध जागापैकी 90 टक्के पेक्षा जास्त प्रवेश झाले आहेत. तसेच पारंपरिक शाखांनाही विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सिव्हिल मध्ये 12 हजार 415 विद्यार्थी दाखल झाले, तर मेकॅनिकल मध्ये 17 हजार,115 विद्यार्थी प्रवेशित झाले. इलेक्ट्रिकल , इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल व बायोटेक्नॉलॉजी या शाखांमध्येही गतवर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.
प्रवेश प्रक्रियेत मुलींचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढला; नागपूर, नाशिक विभाग आघाडीवर
यंदाच्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत मुलींचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढल्याचे अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. राज्यभरातील एकूण प्रवेशांपैकी तब्बल 37.30 टक्के प्रवेश मुलींचे झाले आहेत. मागील वर्षी हा आकडा 35.38 टक्क्यांवर होता. विशेष म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स , मशिन लर्निंग, डेटा सायन्स या आधुनिक शाखांमध्ये मुलींचा कल अधिक आहे. विभागनिहाय पाहता मुंबई विभागात 10 हजारांहून अधिक मुली, तर पुण्यात तब्बल 26 हजारांहून अधिक मुलींनी प्रवेश घेतला आहे. नागपूर आणि नाशिक विभागांमध्येही मुलींची टक्केवारी अधिक नोंदली गेली आहे.