मुंबई : जोगेश्वरीतील एका बांधकाम प्रकल्पासाठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून एका खासगी बांधकाम कंपनीच्या जयकुमार गुप्ता व सुयश जयकुमार गुप्ता या पिता-पूत्र संचालकांनी 20 जणांची सुमारे 31 कोटीची फसवणूक केली आहे. अंधेरी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.
यातील तक्रारदार फार्मा व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत अंधेरी येथे राहतात. चार वर्षांपूर्वी त्यांची रणबीर रियल इस्टेट ॲण्ड डेव्हलपर्स या कंपनीचे संचालक असलेल्या जयकुमार आणि सुयश यांच्याशी ओळख झाली होती. त्यांनी त्यांच्या कंपनीकडून जोगेश्वरीतील मेघवाडी परिसरात एक बांधकाम प्रकल्प सुरू असल्याची माहिती दिली. तिथे तीन इमारतीचे बांधकाम होणार असून त्यापैकी एका इमारतीत फ्लॅटसह गाळेधारकांना गाळे देण्यात येणार आहे. उर्वरित दोन इमारतीमधील फ्लॅट व गाळे विक्रीसाठी असतील असे सांगून त्यांना त्यांच्या प्रकल्पात गुंतवणूक करण्याची विनंती केली.
या गुंतवणुकीवर त्यांना अठरा टक्के व्याज देण्याचेही आमिष दाखवले. त्यांचे प्रपोजल आवडल्याने त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या कंपनीत एप्रिल 2021 ते मे 2023 या कालावधीत 8 कोटी 26 लाखांची गुंतवणूक केली. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांना मार्च 2021 ते सप्टेंबर 2024 या कालावधीत व्याजाची रक्कम दिली. मात्र नंतर त्यांनी व्याजाची रक्कम देणे बंद केले. याबाबत विचारणा केल्यावर ते दोघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते.
चौकशीदरम्यान त्यांना त्यांच्या परिचित व्यापाऱ्यासह इतर 18 जणांनी त्यांच्या बांधकाम प्रकल्पात 31 कोटी 26 लाखांची गुंतवणूक केल्याची माहिती समजली. काही महिने परताव्याची रक्कम दिल्यानंतर त्यांना उर्वरित रक्कम देणे बंद केले होते. जयकुमार आणि सुयश यांच्याकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अंधेरी पोलिसांत तक्रार केली.
या तक्रारीनंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास संबंधित पोलिसांनी सुरु केला आहे. गुन्हा दाखल झाल्याने या दोघांना चौकशीसाठी हजर राहण्याचे लवकरच समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.