मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप महायुती म्हणूनच लढू; पण कार्यकर्त्यांची इच्छा असेल तिथे महायुतीचे नेते निर्णय घेतील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 'पुढारी न्यूज'ला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले. कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने त्या कार्यकर्त्यांच्या मर्जीनेच लढणे गरजेचे असते.
येणाऱ्या काळात प्रमुख नेते याचा विचार करतील. काही ठिकाणी त्यांचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असे सांगत चव्हाण यांनी काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचा पर्याय असल्याचे संकेत दिले. महायुती म्हणून हे सगळे चांगल्या पद्धतीने कसे पुढे नेता येईल, यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत, असे ते म्हणाले.
ठाकरे बंधू कशासाठी एकत्र आले हे सर्वांनाच माहीत आहे, आम्ही त्यांना विकासाच्या मुद्द्यानेच उत्तर देऊ, असे चव्हाण म्हणाले. महाराष्ट्रात मराठी सक्तीची राहील हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. इतर भाषा ऐच्छिक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. विरोधक विनाकारण दिशाभूल करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचा 'युनेस्को'च्या यादीत समावेश झाला. या निर्णयाचा आदर विरोधक करतात का? असे सांगत चव्हाण यांनी विरोधकांवर निशाणा साधला. संघटना अधिक मजबूत करणे आणि विरोधकांचा खोटा नरेटिव्ह मोडून राज्य आणि केंद्र सरकारचे हिताचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवणे याला आपले प्राधान्य असेल, असे चव्हाण यांनी सांगितले.
कोकणातील स्थलांतर थांबवण्यासाठी कोकणात प्रकल्प होणे गरजेचे आहे. प्रत्येक पंचक्रोशीमध्ये काही ना काही निर्माण करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री याबाबत आखणी करत आहेत, मला विश्वास आहे, त्यामुळे कोकणात विकास होऊन स्थलांतर थांबेल, असे चव्हाण यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राजकीय संघर्ष असल्याच्या चर्चेवर चव्हाण यांनी भाष्य केले. शिंदे यांच्याशी चांगले संबंध आहेत, प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शिंदे यांनी फोन करून आपले अभिनंदन केले, असे चव्हाण यांनी सांगितले. पक्षातील लोकांचा विरोध डावलून सुधाकर बडगुजर यांच्यासारख्या नेत्यांना प्रवेश दिला जातो, याबद्दल विचारले असता, स्थानिक लोकांशी चर्चा करूनच याबाबत निर्णय घेतला जातो, असे चव्हाण यांनी सांगितले. काही ठिकाणी काही दिवसांपुरती नाराजी असते. कालांतराने ती दूर करता येते, असे चव्हाण म्हणाले.