Ravi Pujari Extortion Case Pudhari
मुंबई

Ravi Pujari Extortion Case: रवी पुजारी पुन्हा चर्चेत! २० वर्षांपूर्वीच्या खंडणीपासून १० कोटींच्या आरोपापर्यंत काय आहे संपूर्ण प्रकरण?

माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडून १० कोटींची मागणी केल्याचा आरोप; २००६च्या २५ लाखांच्या प्रकरणातही मकोका

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात खंडणीच्या माध्यमातून आपले नेटवर्क उभे केल्याचा आरोप असलेल्या रवी पुजारीविरुद्ध विशेष मकोका न्यायालयाने दोन खंडणी प्रकरणांत आरोप निश्चित केले आहेत.

यातील एका प्रकरणात माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडून १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.

दुसरे प्रकरण २००६ मधील असून, त्यात २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. न्यायालयाने पुजारीला दोन्ही प्रकरणांत खटल्याला सामोरे जाण्याचे निर्देश दिले आहेत.

नोव्हेंबर २०१७ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी खासगी गुप्तहेर सतीश मंगले आणि अन्य दोघांविरोधात खंडणीची तक्रार केली होती.

मोपलवार यांच्या कथित संभाषणाच्या ध्वनिफिती सार्वजनिक करण्याची धमकी देत १० कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, नंतर ही मागणी सात कोटी रुपयांवर आणण्यात आली. मंगले यांना एक कोटी रुपये स्वीकारताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मंगले, त्यांची पत्नी आणि मेहुण्याला या प्रकरणात आरोपी करण्यात आले.

या आरोपींना अटक झाल्यानंतर मोपलवार आणि त्यांच्या मुलीला रवी पुजारीच्या नावाने दोन आंतरराष्ट्रीय फोन आल्याचा आणि खंडणीचा गुन्हा मागे घेण्यासाठी धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. या कथित धमकीप्रकरणी पुजारीविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

या प्रकरणात एक महत्त्वाची बाब म्हणजे २०२३ मध्ये विशेष मकोका न्यायालयाने सतीश मंगले, त्यांची पत्नी श्रद्धा मंगले आणि अतुल तांबे यांची निर्दोष मुक्तता केली होती. तपासात त्रुटी असल्याचे तसेच पुजारीशी त्यांचा संबंध सिद्ध करणारे पुरावे अपुरे असल्याचे न्यायालयाने नमूद केले होते.

पुजारी भारतात परतल्यानंतर पोलिसांनी त्याचा ताबा घेतला नव्हता आणि कथित धमकीच्या फोनशी तुलना करण्यासाठी त्याचा आवाजाचा नमुना घेण्यात आला नव्हता, असेही न्यायालयाच्या निरीक्षणात आले होते.

२००६चे २५ लाखांचे प्रकरण

दुसरे प्रकरण २००६ मधील आहे. सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, पुजारीने एका दोषी ठरलेल्या साथीदारासोबत मिळून आतिख अहमद खलिल अहमद शेख यांच्याकडून २५ लाख रुपयांची खंडणी मागण्याचा कट रचला.

खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. १७ ते २५ मे २००६दरम्यान शेख यांच्याकडून पाच लाख रुपये हप्ता घेतल्याचा सरकारी पक्षाचा दावा आहे. या प्रकरणातही पुजारीविरुद्ध मकोका अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.

सेनेगलमधून भारतात

पुजारीला २०१९ मध्ये सेनेगलमध्ये ताब्यात घेण्यात आले. प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेनंतर फेब्रुवारी २०२०मध्ये त्याला भारतात आणण्यात आले. त्यानंतर त्याला बंगळुरूतील परप्पना अग्रहार केंद्रीय कारागृहात ठेवण्यात आले होते.

मार्च २०२६मध्ये ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने त्याचा ताबा याच कारागृहातून घेऊन २०१७च्या खंडणी व गोळीबाराच्या प्रकरणात त्याला ठाण्यात आणले होते. पुन्हा त्याची रवानगी बंगळुरू कारागृहात करण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT