भाजपप्रणीत सरकार आणि भाजपची मातृसंस्था म्हटला जाणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात काही मतभेद झाल्याची चर्चा... file photo
मुंबई

RSS | संघ अधिक सक्रिय होण्याचे संकेत!

पुढारी वृत्तसेवा
सुरेश पवार

मुंबई ः ‘मी देव आहे, असे स्वतः म्हणू नये’, या सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या वक्तव्याने भारतीय जनता पक्षासह (BJP) विविध पक्षांतही उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. अलीकडील काही काळात भाजपप्रणीत सरकार आणि भाजपची मातृसंस्था म्हटला जाणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (Rashtriya Swayamsevak Sangh) यांच्यात काही मतभेद झाल्याची चर्चा होती. भागवत यांच्या ताज्या वक्तव्याने त्यात भर पडली आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर संघ आता अधिक सक्रिय होण्याचेही संकेत असल्याचे म्हटले जात आहे.

रा. स्व. संघाची (Rashtriya Swayamsevak Sangh) उच्चस्तरीय बैठक नुकतीच केरळ राज्यातील पलाक्कड येथे झाली. या बैठकीत जे निर्णय घेण्यात आले, ते भाजपप्रणीत सरकारवर अंकुश राहावा, अशा उद्देशाने असल्याचे जाणकारांचे मत आहे. भाजपच्या देश, प्रांत, जिल्हा पातळीवरील पक्ष रचनेमध्ये संघटनमंत्री हा संघाचा असतो. आता या पदावर अधिक कणखर आणि खंबीर कार्यकर्त्याची नियुक्ती करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. भाजप संघटनेवर आणि पर्यायाने सरकारवर दबाव राहावा, यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

भाजपप्रणीत सरकारच्या काही धोरणावर स्पष्ट टीका करण्याची भूमिका घेण्याचेही या बैठकीत ठरविण्यात आले आहे. बांगला देशात हिंदूधर्मीयांची ससेहोलपट सुरू आहे. त्याबाबत सरकारने ठोस पावले उचलली नसल्याची भावनाही बैठकीत व्यक्त करण्यात आली आणि अशा घटनांवर खडे बोल सुनावण्याचे ठरविण्यात आले आहे.

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. राहुल यांच्याप्रमाणे या बैठकीतही तशी मागणी करण्यात आली. अशा जनगणनेतून खरे पीडित आणि दुर्बल कोण यांचा बोध होईल आणि खर्‍या गरजूंना सरकारी सवलतींचा लाभ घेता येईल, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. त्यातून या मागणीसाठी सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

पलाक्कड बैठकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पुणे येथील एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी देवत्वाचा मुद्दा जाहीर रीतीने उच्चारला. देवत्व लोकांनी ठरवावे, अशी मल्लिनाथी त्यांनी केली. त्यांच्या या विधानातून रा. स्व. संघ आणि भाजपप्रणीत सरकार यांच्यातील मतभेद वाढले आहेत का, अशा चर्चेला जोर आला आहे. त्यातून संघ आता भावी काळात कोणती भूमिका घेणार, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT