मुंबई : न्यूरोकॅन्थो साइटोसिस कोरिया या दुर्मिळ व गंभीर न्यूरोलॉजिकल आजाराने त्रस्त असलेल्या एका युवतीला अत्याधुनिक डीप ब्रेन स्टिम्युलेशन (डीबीएस) शस्त्रक्रियेच्या मदतीने नवजीवन मिळाले आहे.
या आजारामुळे युवतीच्या शरीरावरचा ताबा पूर्णपणे सुटला होता. नकळत नाचासारख्या हालचाली, बोलण्यात अडचण, गिळण्यात त्रास, स्मरणशक्ती कमजोर होणे अशा समस्यांनी ती ग्रस्त होती. लाल रक्तपेशी गोलाकार न राहता काटेरी स्वरूप धारण करून मेंदूतील नसांवर परिणाम करत होत्या.
वॉकहार्ट रुग्णालयात तिच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. न्यूरोसर्जन डॉ. मनीष बाल्दिया यांनी सांगितले की, हा जगातील अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीचा आजार आहे. दहा लाख लोकांमध्ये एकाला क्वचित हा आजार होतो. पारंपरिक उपचार पद्धती जवळपास नसल्याने आम्हाला न्यूरोमॉड्युलेशन तंत्रज्ञान वापरावे लागले. डीबीएसमध्ये मेंदूच्या ठराविक भागांमध्ये इलेक्ट्रोड बसवले जातात आणि त्यामुळे मेंदूतील सर्किट नियंत्रणात येते, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.