मुंबई : प्रकाश साबळे
वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणीचा बाग) नवीन वर्षांत पर्यटकांसाठी लवकरच दोन सिंह आणि दोन लांडग्यांचे आगमन होणार आहे.
वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाने गेल्या दीड वर्षांपूर्वी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, दिल्ली यांच्याकडे प्रस्ताव दिलेला आहे. या प्रस्तावाला प्राधिकरणाची मंजुरी बाकी आहे. यामुळे राणीच्या बागेत येऊ घातलेले सिंह आणि लांडग्यांच्या जोडीचे आगमन लांबणीवर पडल्याची सांगण्यात आले. दोन सिंह आणि दोन लांडगे या दोन प्राण्याच्या बदल्यात बागेतील तितकेच इतर प्राणी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला द्यावे लागतील, परंतु सध्याच्या घडीला बागेत इतर प्राणी देण्यासारखी परिस्थिती नाही, कारण अनेक प्राणी हे नवीन आणि लहान आहेत. तर काहींचे वय झालेले आहेत. यामुळे आता राणीचा बाग प्राणिसंग्रहालय प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.
राणीच्या बागेत दोन सिंह आणि दोन लांडगे आणण्यासाठी बागेकडे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाला पेग्विंनशिवाय दुसरे प्राणी देण्यासारखे नाहीत, यामुळे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून जर पेंग्विंनची मागणी झाल्यास, ती किती पेंग्विनची होते, आणि कशाप्रकारे होते, याची चिंता बागेतील प्रशासन करत असल्याचे दिसून येत आहे.
एखाद्या प्राणी संग्रहालयात नवीन प्राणी देवाण-घेवाणाच्या प्रक्रियेसाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांची परवानगी लागते. आणि जर एखाद्या प्राणी संग्रहालयात नवीन प्राणी आणायचे झाल्यास, त्या बदल्यात इतर प्राणी द्यावे लागतात, या देवाण-घेवाणीच्या प्रक्रियेला जास्त कालावधी लागतो. परिणामी प्राणी संग्रहालयात नवीन प्राण्याच्या आगमनास विलंब होतो, असे बागेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले.