भारतीय सागरी दुर्घटनेत सर्वात मोठी म्हणून रामदास बोट दुर्घटना ओळखली जाते. सातशेपेक्षा अधिक प्रवाशांना या दुर्घटनेत जलसमाधी मिळाली. 17 जुलै 2025 रोजी या दुर्घटनेस 78 वर्षे होत आहेत. या घटनेच्या स्मृतींचा मांडलेला हा लेखाजोखा...
त्यांची सणादिकांची स्वप्नं... कुटुंबीयांसाठी आतुर, अन उत्सुकता आनंद क्षणाची...अशा चिंब स्वप्नाच्या दुनियेत सवारलेले ते प्रवासी अखेर ठरले घडीचे प्रवासी. 17 जुलै 1947 रोजीची सकाळ जणू उगवतीचा प्रकाश घेऊन निघालेली परंतु काळ्या डोहाकडे ते निघाले अन् होत्याचे नव्हते घडले, दीपपूजेचा दीपच हरखला...रायगडाच्या खारेपाटात आजही रामदास बोट दुर्घटनेच्या आठवणींनेे दुर्घटनाग्रस्त-आप्तजन परिसर भावविभोर होऊन जातो ...
निसर्ग आणि मानव यांचे द्वंद्व हे अनादी काळापासूनचे, मात्र मानवी हुंकार त्याला स्वस्त बसू देत नाहीत, आणि म्हणूनच साहसी कर्म त्याला सतत खुणावत असतात. कधी कधी मग आपले बळ कसे थिटे पडतात... अन त्या महाशक्तीला शरणागत होऊन जातात, रामदास बोटीची दुर्घटना याचेच प्रत्यय आणणारी घटना. त्याकाळी मुंबई-गोवा सागरी मार्गावर धावणारी ही रामदास बोट, आठवड्यात शनिवारी मुंबई -रेवस फेरी करायाची. त्यामुळे या बोटीला नवरी बोट असेही या भागात म्हणायचे.
179 फूट लांब, 29 फूट रुंद व 406 टन वजनाची ही बोट. एक हजारपेक्षा प्रवासी वाहण्याची क्षमता असलेले हे जहाज बिट्रिश नौदलासाठी सैन्याची ने-आण करण्यासाठी बांधलेले. परंतु दुसरे युद्ध समाप्तीमुळे 1942 मध्ये ब्रिटिश सरकारकडून भारतातील बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीने कोकण किनापरपट्टीवर प्रवासाठी विकत घेतली.
तसे पाहिल्यास एखाद्या रूटची प्रवाशांना नेहमीच सवय असते. अशीच स्थिती त्याकाळी रामदास बोट प्रवाशांमध्ये होती. रेवस, सासवने आदी खारेपाट परिसरातील भूमिपुत्र भाजीपाला मुंबईला घेऊन येत व विक्रीनंतर दुसर्या दिवशी सकाळी या बोटीने घरी जात. तो दिवस दीपपूजा अर्थात गटारी अमावस्येचा. या सणाला खारपाटात अनन्यसाधारण महत्त्व. त्यामुळे मुंबईतील चाकरमानी न विसरता या सणास हजेरी लावत.
ता. 17 जुलै 1947 रोजी रामदास आपल्या नेहमीच्या मार्गावर स्वार झाली. बोट सकाळी 8 वाजता सुटली. गटारी अमावस्येमुळे नेहमीपेक्षा प्रवासी संख्या अधिक होती. त्या दिवशी पावसाची रिपरिप सुरू होती. तसेच लाटांचे फवारे संरक्षणासाठी बोट दोन्ही बाजूनी ताडपत्र्यांनी शाकारली होती. नेहमीचे प्रवासी. गप्पागोष्टी करीत स्थिरावत होते अन बोट अरबी समुद्राच्या कवेत शिरू लागली अन पाऊस सरीही झाकोळल्या जाऊ लागल्या, ताडंवी लाटा अन काळ्या ढगांच्या वादळी छायेनं परिसर प्रलंयकारी होऊ लागला.
बोट पूर्ण वेगाने काशाच्या खडकाचा ट्रँगल भेदण्याच्या पवित्र्यात, परंतु राक्षसी तांडवी लाटांनी बोट बाहुलीसारखी डोलू लागली, आता या घुघाटातून बोट पुढे-मागे जाऊ शकत नव्हती हे कप्तानने जाणले, सैरभर प्रवांशांना समजवण्याचा प्रयत्न झाला, परंतु तांडवी लाटांनी ते प्रवासी बेहाल झाले, स्वप्नांवर मळभ दाटून आले, राक्षसी लाटा, जोरदार वार्यांनी बोट चक्रवातात अडकली. ठाणा खाडीच्या मुखाकडेत द्रोणागिरी-पिरवडीच्या किनारी धडकणार्या अन् अंबा नदीच्या अर्थात काशाच्या खडकाच्या परिसरात चुभांट भरला. अन उलटी चुंभाटी लाटांनी रामदास बोटीचा श्वास कोंडला... अशाच एका राक्षसी लाटेने रामदासला काशाच्या देखत गिळंकृत केले. सकाळी 9 वाजताच काळ्या डोहात रामदास विसावली भाऊच्या धक्क्यापासून 8 मैल अन रेवस धक्का 4 मैल असलेल्या या ठिकाणी.
अमावस्या-पौर्णिमेला-सागरात उधाणी लाटांचा बोलबाला असतो. त्या दिवशी बोटीच्या कप्तानने दोन दिवस वादळीवार्यात कशीबशी बोट आणतोय अशी माहिती कंपनी अधिकार्यांना दिली होती परंतु उद्याचे उद्या बघू असे उत्तर त्यास दिले. त्याच दिवशी रेवस धक्क्यावर कोळीबांधव मुंबईला मच्छी घेऊन जाण्यास सज्ज होते परंतु धक्क्यापासू दोन मैलावर जाताच आसमंत प्रलयी वादळाने झाकोळला होता, हे पाहताच त्यानी पडाव तसेच रेवस धक्क्यावर आणले नंतर स. 9.30 वाजता पुन्हा पडाव मुंबईस घेऊन निघाले. आणि काशाच्या खडकाजवळ जाताच तरंगणारी प्रेते, जीवाच्या आकांतानेे पोहत असलेल प्रवासी पाहून त्याना रामदास बोट दुर्घटनेचा माहिती मिळाली त्यानी पडावातील मच्छी समुद्रात टाकून जवजवळ 75 जणांना वाचवले व दु. 1 वा. रेवसला घेऊन धक्क्यावर ही माहिती दिली. नंतर तारेने कंपनीला मुंबईत साय. 6 वा. ही माहिती दिली. अखेर वादळाची तमा मासेमार बांधवांनी ओळखली परंतु धंदेवाईक कंपनी अधिकार्यांना ना सोयर सुतक ...अखेर दैवदुर्विलास... त्या भूमिपुत्रांचा...