मुंबई : राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीला एक उमेदवार निवडून आणता येणार आहे. त्यातच आता संख्याबळाचा दाखला देत राज्यसभेची ही जागा शिवसेना ठाकरे गटाचीच असून ती आम्हालाच मिळायला हवी, अशी ठाम भूमिका ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मांडली आहे. त्याचवेळी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांकडे लक्ष वेधत शरद पवार गटाला ही जागा सोडण्यापूर्वी पक्ष म्हणून युती-आघाडीत कोण कुठे असणार आहे, याची चाचपणी करावी लागणार असल्याची भावनाही आदित्य यांनी स्पष्टपणे बोलून दाखविली आहे.
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी राज्यसभेवर जायला हवे, अशी भूमिका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मांडली होती. मात्र, आदित्य ठाकरे यांनी पक्षाची भूमिका मांडत संख्याबळानुसार ही जागा शिवसेना ठाकरेंची असून ती आम्हालाच मिळायला हवी, असे स्पष्ट केले आहे. त्याचवेळी या जागेवरून पक्षात कोणताही वेगळा मतप्रवाह नसल्याचे सांगत संजय राऊत यांची यासंदर्भातील भूमिका निकालात काढली आहे.
संख्याबळ पाहता आणि राज्यसभेत संजय राऊत व प्रियंका चतुर्वेदी देत असलेला लढा पाहता, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दोन खासदार राज्यसभेत असणे गरजेचे आहे. देशहित असो, महाराष्ट्रहित असो, धारावीचे अथवा मुंबईचे अदानीकरण असो किंवा पर्यावरणाचा ऱ्हास असो, या दोन्ही खासदारांनी इंडिया आघाडीच्या संविधान रक्षणाच्या लढ्यात नेहमीच अग्रेसर राहण्याची भूमिका घेतली आहे. पक्षाचे आणि पक्षाच्या सर्व आमदारांचे हेच मत आहे की या दोन्ही जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याच असाव्यात! अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी समाजमाध्यमातून पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने विलीनीकरणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, असे काँग्रेसने शनिवारी म्हटले होते. त्यावर शरद पवार गटाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती.
शरद पवारांबद्दल आदर, पण...
महाविकास आघाडीकडून राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा संजय राऊतांनी केली होती. मात्र, संख्याबळानुसार ही जागा आमचीच असल्याचे सांगताना यासंदर्भातील चर्चा बाकी असून अशी कोणतीही चर्चा मातोश्रीवर व्हायला हवी. तसेच मित्रपक्ष असलेल्या काँग्रेससोबतही बोलावे लागेल, असे आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. त्याचवेळी, कोणा व्यक्तीबद्दल बोलत नसून पक्ष म्हणून भूमिका आहे. शरद पवारांबद्दल आदरच आहे. मात्र, दोन पक्षांचा विचार केला तर आत्ता सध्या महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे हे पाहावे लागेल. कोणती युती आहे किंवा
आघाडी आहे हे तपासावे लागेल. कारण, एका बाजूला विलीनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र निवडणुका लढविलेल्या आहेत. मुंबईतही शरद पवार पक्षाने एकनाथ शिंदेंच्या पक्षाला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे राजकीय समीकरणे आणि संख्याबळ तपासावे लागेल,असेही आदित्य ठाकरे म्हणाले. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महाविकास आघाडीतील स्थानाबाबत असलेला संभ्रम स्पष्टपणे मांडताना सातव्या जागेसाठी मातोश्रीवर चर्चा होईल, मित्रपक्ष असलेल्या काँग्रेससोबतही चर्चा करावी लागणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.