राजू शेट्टी Pudhari File Photo
मुंबई

Mango Farmers Protest : आंबा उत्पादकांचा आज ‘वर्षा’वर कैफियत मोर्चा

आंबा उत्पादनात यंदा ९० टक्के घट, सरकारकडून अजून दखल नाही : राजू शेट्टी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : चालू वर्षात आंब्याची मोहोर गळती, अवकाळी पाऊस, तापमानात चढ-उतार, फळमाशीचा प्रादुर्भाव, तुडतुडे व बुरशीजन्य रोग, वाढत्या कीटकनाशकांच्या खर्चामुळे कोकणातील आंबा व काजू बागायतदार पूर्णपणे प्रभावित आहे. या बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसल्याने देवगडसह अनेक भागांमध्ये आंबा उत्पादनात ९० टक्क्यांहून अधिक घट झाली असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितले. गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलने करूनही सरकारकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने कोकणातील आंबा बागायतदार शुक्रवारी ‘वर्षा‌’वर कैफियत मोर्चा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सिंधुदुर्ग आंबा काजू बागायतदार व व्यापारी महासंघाच्या प्रमुख कार्यकर्त्यानी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उबाठा खासदार विनायक राऊत, काँग्रेस नेते भाई जगताप, कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. प्रकाश रेड्डी, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार, जनता दलचे प्रभाकर नारकर, धर्मराज्य पक्षाचे राजन राजे, शेकापचे राजेंद्र कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोकणातील आंबा, काजू आणि मत्स्य व्यवसायावर अवलंबून असलेला शेतकरी सध्या अभूतपूर्व आर्थिक संकटात आहे. अस्मानी व सुल्तानी संकटांमुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीने ठोस मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.

गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्री निवास ‌‘वर्षा‌’ या मार्गावर मोर्चा

आंबा संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विद्यापीठांकडून तातडीच्या उपाययोजना अपेक्षित असताना शासनाच्या कृषी, फलोत्पादन व मत्स्य विभागाने प्रभावी पावले उचलली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. राज्य सरकारने गेल्या अर्थसंकल्पात केवळ हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने आंदोलने करूनही सरकारकडून कोणतीही ठोस दखल घेतली गेली नाही. त्यामुळे कितीही अडथळे आणले तरी कोकणातील आंबा बागायतदारांच्या वतीने शुक्रवारी १५ मे रोजी गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्री निवास ‌‘वर्षा‌’ या मार्गावर धडक कैफियत मोर्चा काढणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT