राज ठाकरे Pudhari News Network
मुंबई

Raj Thackeray | 'मी स्वच्छ शब्दांत सांगतो की..', शिक्षणातील 'हिंदीकरणा'वर राज ठाकरे कडाडले

Raj Thackeray | "...तर मात्र संघर्ष अटळ"; ठाकरेंचा सरकारला इशारा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात जूनपासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० लागू होत आहे. यामध्ये इयत्ता पहिलीपासूनच हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर मनसे प्रमुख राज ठाकरे तीव्र शब्दांत कडाडले आहेत. त्यांनी सरकारच्या हिंदीकरणाच्या धोरणाचा तीव्र निषेध केला आहे. राज ठाकरे यांनी आज (दि.१७) या संदर्भात एक्स (X) सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केली आहे.

'हिंदी' पहिलीपासून का शिकायची?; राज ठाकरेंचा सवाल 

मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, "सरकारचं सध्या जे सर्वत्र 'हिंदीकरण' करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची ? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे, ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरु झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे" अशा तीव्र शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

'ही' सक्ती खपवून घेणार नाही; मनसे प्रमुख

केंद्र आणि राज्य सरकारच्या शिक्षणातील 'हिंदीकरणा'वर राज ठाकरे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की..."ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही".

'... तर ते आम्हाला मान्य नाही'

पुढे ठाकरे म्हणाले की, "प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या घडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो, परंपरा असते. आणि ती ज्या राज्याची भाषा असते, त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे, तसा सन्मान इतर राज्यात 'त्या-त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे. अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी जनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे. पण हे सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही".

सरकार मुद्दामून संघर्ष घडवतंय; ठाकरेंचा आरोप

"आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत ! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की, सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे. येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्द मराठी असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी तर हा सगळा अट्टाहास सुरु आहे का? या राज्यातील मराठी भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा. त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे असं काही नाही. त्यांना तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे, असा आरोप देखील त्यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर केला.

भाजपची 'फोडा आणि राज्य करा...' निती

आज राज्याची आर्थिक अवस्था बिकट आहे, सरकारकडे योजनांसाठी पैसाच शिल्लक नाही. मराठी तरुण-तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जमाफी करू असं निवडणुकीच्या आधी सांगितलं, पण पुढे ती केलीच नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या आशेवर असलेला शेतकरी निराश आहे. आणि उद्योग जगताने महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्यासारखी परिस्थिती आहे. जेव्हा सांगण्यासारखं किंवा ठोस दाखवण्यासारखं काहीच नसतं, तेंव्हा फोडा आणि राज्य करा हा ब्रिटिशांचा मंत्र इथे वापरला जातोय, अशी शंका यावी अशीच पाऊलं सरकारकडून उचलली जात आहेत.

हिंदी सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का ? ; ठाकरेंचा सवाल

बरं हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का ? ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का ? आणि करून तर बघा, तिथली सरकारंच पेटून उठतील. इथलं राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळं खपवून घेतात म्हणून इथे ही सक्ती केली जात आहे. बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला देणंघेणं पण नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही, असे स्पष्ट आणि ठामपणे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारला ठणकावले.

"...तर मात्र संघर्ष अटळ"; सरकारला थेट इशारा

महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे खपवून घेतली जाणार नाही. शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत, याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी. प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या राजभाषेचाच मान राखला गेला पाहीजे ! उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिली पासून शिकवाल का ? नाही ना ? मग ही जबरदस्ती इथेच का ? हा मुद्दा ताणू नये असं माझं सरकारला आवाहन आहे. पण या आवाहनाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकारच जबाबदार राहील. त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे तात्काळ घेण्याचे आदेश द्यावेत, असेही राज ठाकरे म्हणाले.

'म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण ...' राज ठाकरेंकडून भाजपचा निषेध

"माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठी मातांना, भगिनींना आणि बांधवांना तसेच माझ्या मराठी वर्तमानपत्रात आणि मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना देखील विनंती आहे की, यात कोणताही वादविवाद न करता याचा निषेध आणि विरोध करावा ! आणि हो...! महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांना जर थोडं जरी मराठी भाषेबद्दल प्रेम असेल तर ते देखील याला विरोध करतील. आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या इतर सक्तीचे फतवे काढतील. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो " अशा तीव्र शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारच्या हिंदीकरणाच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT