Political News : राज यांच्यासाठी शिंदेंची डीनर डिप्लोमसी pudhari photo
मुंबई

Political News : राज यांच्यासाठी शिंदेंची डीनर डिप्लोमसी

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय जुळवाजुळव

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय जुळवाजुळव सुरू झाली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एका हॉटेलात बंद दार भेट घेतल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील राज यांची भेट घेणार आहेत. राज यांच्यासाठी शिंदे यांनी स्नेहभोजन आयोजित केले असून ही डीनर डिप्लोमसी राज-शिंदे यांना एकत्र आणते की राज-उद्धव ठाकरे बंधूंचे जुळते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

राज ठाकरेंसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाची जबाबदारी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर सोपवली असल्याचे समजते. उदय सामंत हे अलीकडे राज यांच्या अधिक संपर्कात आहेत. काही दिवसांपूर्वीच ते शिवतीर्थवर जाऊन आले. तेव्हा पत्रकारांनी टोकले असता राज यांच्या घरची खिचडी खाल्ली आणि गप्पा मारल्या. ही भेट राजकीय नव्हती, असे ते म्हणाले होते. आता सामंत यांच्या व्यवस्थापनाखाली होणार्‍या स्नेहभोजनात कोणत्या गप्पा होणार याबद्दल कुतूहल आहे.

दिवाळीदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या असून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर महापालिकांच्या लढती त्यात प्रतिष्ठेच्या असतील. तीन दशके ठाकरे सेनेची सत्ता असलेली मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने डावपेच आखले असतानाच मनसे आणि उबाठा शिवसेना जवळ येत असल्याची चर्चा सुरू झाली. ठाकरे बंधूंनी एकत्र यावे म्हणून राज्यभरातून दबाव निर्माण झाला असतानाच गेल्या आठवड्यात राज ठाकरे अचानक उठले आणि वांद्य्रातील एका हॉटेलात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बंद दाराआड प्रदीर्घ चर्चा केली. या भेटीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे बोलले जाते. आता राज यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही हालचाली सुरू केल्या आहेत.

शिवसेनेत दोन गट पडल्यानंतरची मुंबई महापालिकेची ही पहिलीच निवडणूक असेल. आतापर्यंत मुंबईतील सुमारे 80 माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. या नगरसेवकांच्या विजयासाठी एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीपूर्वीच ताकद लावली आहे.

भाजपा आणि शिंदे गटाच्या ताकदीसमोर आपले दुसर्‍या किंवा तिसर्‍या फळीतील उमेदवार आर्थिकदृष्ट्या कमी पडतील, अशी शक्यता उद्धव ठाकरे यांना वाटत आहे. दुसरीकडे आपण स्वबळावर निवडून येऊ शकत नाही, असे मनसैनिकांना वाटतेे. अशा परिस्थितीत मनसे आणि उबाठा शिवसेना एकमेकांच्या जवळ येत असल्याची चर्चा सुरू झाली. राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी दोन्ही पक्षातील नेत्यांचीही तीव्र इच्छा आहे. त्यामुळे मनसे आणि उबाठा गटाच्या संभाव्य मैत्रीचा धोका लक्षात घेऊन आधी फडणवीस यांनी आणि पाठोपाठ एकनाथ शिंदे यांनीही राज यांना आपल्या बाजून आणण्याचे प्रयत्न चालवले आहेत.

बिनसलेले संबंध दुरुस्त होणार का?

विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघात अमित ठाकरेंच्या विरोघात शिंदे यांनी सदा सरवणकर यांना उभे केले आणि माघार घेण्यास नकार दिला. त्यावरून शिंदे व राज यांचे बिनसलेले आहे. हे संबंध दुरुस्त करण्यासाठी शिंदे गेल्या एप्रिलमध्ये शिवतीर्थवर जाऊन आले. आता स्नेहभोजनाच्या निमित्ताने त्यांची राज यांच्याशी पुन्हा भेट होऊ घातली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT