मुंबई : रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका. मुंबईवर ज्या प्रकारचा डोळा आहे त्यासाठी मतदार याद्यांच्या माध्यमातून जे राजकारण सुरू आहे त्याकडे लक्ष ठेवा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केले.
मराठी माणसासाठी येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणुक ही शेवटची निवडणुक असणार आहे. यावेळी जर मुंबई हातातून गेली तर हे लोक जे थैमान घालतील ते कोणालाही आवरता येणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मोसम सुरू झाला आहे. त्यात मुंबई महापालिकेची निवडणूक सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.अद्याप मुंबईच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी मतदार याद्यांचे प्रारूप जारी करण्यात आले आहे. त्यावरील हरकती सूचना मागविण्यात आल्या आहेत. मतचोरीच्या मुद्दयावर मनसे आणि महाविकास आघाडीने भाजपसह निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे.याच पार्श्वभूमीवर रविवारी मुंबईत कोकण महोत्सवात उपस्थितांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी मतदार याद्यांबाबत दक्षता बाळगण्याचे आवाहन आपल्या समर्थकांना केले.
लवकरच भाषणांचा धडाका सुरू होईल तेव्हा सविस्तर भाष्य करण्याचा मनोदय व्यक्त करत राज ठाकरे म्हणाले की, रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा. मुंबईवर ज्या प्रकारे डोळा आहे, त्यासाठी मतदार याद्यांतून जे राजकारण सुरू आहे, त्याकडे लक्ष ठेवा. मतदार खरे आहेत की खोटे आहेत? यावरही तुमचे लक्ष असणे गरजेचे आहे. त्याचवेळी, येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक असेल, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.