मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज (दि.२१) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचले. या भेटीची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. बेस्ट कर्मचारी सोसायटी निवडणूकीत ठाकरे ब्रँड चालला नाही, त्यानंतर राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज (दि.२१) सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले आहेत. फडणवीस यांची भेट घेण्यासाठी ते त्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहचले आहेत. अलीकडेच झालेल्या बेस्ट निवडणुकीत 'ठाकरे' ब्रँड चालला नसल्याचे दिसून आले होते. त्यानंतर लगेचच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी गेल्याने विविध राजकीय तर्क-वितर्कांना ऊत आला आहे. तर गणपतीनिमित्त घरी येण्याचे आणि महाराष्ट्रातील पूर स्थितीबाबत बोलण्यासाठी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेल्याची माहिती देखील समोर आली आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चाही सुरू असताना, राज ठाकरे आणि फडणवीस यांची भेट राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग भरू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या भेटीमुळे मनसेच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत नवे संकेत मिळू शकतात. ठाकरे ब्रँडच्या अलीकडील अपयशानंतर राज ठाकरे कोणत्या नव्या राजकीय समीकरणांकडे वळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप आणि मनसेमधील संबंध पुन्हा दृढ होणार का, यावरही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी झालेली भेट केवळ नागरिकांच्या प्रश्नापुरती मर्यादित राहते की, ती महाराष्ट्राच्या आगामी राजकीय समीकरणांना नवा वळण देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.