Raj Thackeray Meets Devendra Fadnavis
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात गुरुवारी (दि.१२ जून) वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये बैठक झाली. उभय नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत चर्चा सुरु झाल्याचे समजते. दोघांमध्ये बंद दाराआड झालेल्या या चर्चेवेळी कुणालाही प्रवेश नव्हता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु असताना मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दोन ठाकरे एकत्र येण्यापूर्वीच त्यांचे कार्यकर्तेही एकत्र येण्यास सुरूवात झाली आहे. राज आणि उद्धव अजून एकत्र आले नसले तरी त्यापूर्वीच फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीने राज्यात मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे सकाळी ९.४० दरम्यान ताज लँड्स एंडमध्ये पोहोचले. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी १०.३५ वाजता हॉटेलमध्ये दाखल झाले. कोणतीही नियोजित भेट नसताना दोन्ही नेत्यांमध्ये मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक झाली.
ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चेवर फडणवीस यांनी नुकतीच एका वाक्यात प्रतिक्रिया दिली होती. "हिंदीत म्हण आहे, कब बाप बनेगा, कब बैल बटेंगे." मुळात दोन्ही भावांच्या युतीवर रोज आम्ही काय बोलणार आहे, असे फडणवीस म्हणाले होते.
मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीवर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे हे दरवेळी जेव्हा भेटतात तेव्हा त्यांची कामे असतात. काही सूचना असतात. पुढची राजकीय परिस्थिती काय असेल? त्यावर आता भाष्य करणे योग्य होणार नाही. या भेटीवर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस खुलासा करतील, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.
ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर बोलताना ते म्हणाले की, राजकारणात यू- टर्न अनेकवेळा पाहायला मिळतात. पण जोपर्यंत युती होत नाही, तोपर्यंत बोलता येत नाही. जे काही होईल ते काही दिवसांत समजेलच. मात्र राजकारणात काहीही होऊ शकते. राज ठाकरे यांना यापूर्वीही आम्ही ऑफर दिली होती. आजही आमची राज ठाकरे यांना सोबत येण्यासाठी ऑफर दिली आहे. राज ठाकरे हे चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेची निवडणूक लढू शकतात. त्यांनी आमच्यासोबत यायला पाहिजे. कोण काय बोलतो? यापेक्षा युती कुणाशी होते? कुणासोबत होते? हे पाहणे महत्त्वाचे आहे. उद्धव ठाकरे गटाची भूमिका काय आहे? हे कळत नाही. शरद पवार त्यांच्यासोबत नाहीत. काँग्रेस त्यांना विचारत नाही, असा टोला शिरसाट यांनी लगावला आहे.