पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या मराठी भाषेवरील वादग्रस्त विधानाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीदेखील भय्याजी जोशींना कठोर शब्दात सुनावले आहे. या संदर्भातील पोस्ट त्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया एक्स अकाऊंटवरून केली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी, "देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय? असा सवाल केला आहे, तसेच भय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं, असे आव्हानदेखील राज ठाकरे यांनी दिले आहे.
"भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का? उद्या समजा संघ किंवा इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन या विधानाचा निषेध नोंदवणार आहे का ?, असा सवालदेखील राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाला उद्देशून केला.
मुंबई महानगर परीसरात (MMR) चालेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरुवात होताना दिसत आहेत. हे काय चाललंय हे न समजण्याइतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं! हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडाव ?, असेदेखील राज ठाकरे म्हणाले.
आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला, त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येऊन मराठीत बोलून गेले. त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते तर मग जोशी बुवांना हे समजू नये? या असल्या काड्या घालून नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे ध्यानात ठेवा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं, असेदेखील राज ठाकरे यांनी आरएसएसचे भय्याजी जोशी यांनी ठणकावून सांगितले आहे.