Mumbai Tiranga Rally Pudhari
मुंबई

Mumbai Tiranga Rally: दिवंगत विद्यार्थ्यांचे राज ठाकरेंकडून स्मरण

राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या युवांचे स्मरण करत त्यांना अभिवादन केले.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिरंगा विजय जल्लोष सभेच्या निमित्ताने दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कचा परिसर रविवारी 'जेन झी'च्या उत्स्फूर्त गर्दीने व्यापून टाकला.

जमलेल्या तरुणाईला संबोधित करताना देशातील जेन झीने सरकारच्या झिंज्याच उपटल्याचे सांगत राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या युवांचे स्मरण करत त्यांना अभिवादन केले.

या आंदोलनाने ठिणगी पडली असून देशात वणवा पेटल्याचे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले की, काहीजण निवडणुका तीन वर्षांनंतर असल्याचे विचारतात. निवडणुका गेल्या खड्ड्यात, या आंदोलनामुळे मोदींनी पाहिले आहे की, मत चोरता येतात, लोक चोरता येत नाहीत. मन चोरता येत नाही. ही मनं आता पेटलेली आहेत, ही ठिणगी जागती ठेवणे हे आपले काम आहे, असे ठाकरे म्हणाले.

तुम्ही जे आंदोलन पेटवले होते, त्याला जे यश आले, त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. या देशातील जेन झी सरकारच्या 'झिंज्या' कशा उपटते, हे या आंदोलनातून कळल्याचे राज ठाकरे म्हणाले.

गुन्हे मागे घ्या : रोहित पवार

दहा दिवसांत आंदोलक तरुणांवरील गुन्हे मागे घ्या. जर हे गुन्हे मागे घेतले नाही तर सरकारला महागात पडेल, असा इशारा रोहित पवार यांनी सरकारला दिला.

‘मंत्री प्रधान’ ते ‘पंतप्रधान’ हा प्रवास फार दूर नाही : आदित्य

देशातील तरुणांनी हुकूमशाहीला हादरा दिला आहे. ही नव्या भारतातील तरुणाईची ताकद आहे. ‘मंत्री प्रधान’ ते ‘पंतप्रधान’ हा प्रवास आता फार दूर नाही. नितीन गडकरी यांच्या इथेनॉल धोरणाबाबत आणि निर्मला सीतारामन यांच्या निर्णयांबाबतही जनतेमध्ये नाराजी आहे. आता ही पिढी प्रत्येक प्रश्नावर सरकारला जाब विचारणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सभेनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

सभेनंतर रेंगाळली तरुणाई

तिरंगा विजयी जल्लोष सभेची सांगता झाल्यानंतरही राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी जमली. त्यामुळे या गर्दीला अभिवादन करण्यासाठी राज यांच्यासह उद्धव ठाकरे गॅलरीत आले आणि त्यांनी तरुणाईला अभिवादन केले.

या जमलेल्या गर्दीचा उत्साह आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह यावेळी उद्धव ठाकरेंना आवरता आला नाही. त्यांनी आपल्या मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यातून गर्दीचे फोटो काढायला सुरुवात करताचा तरुणांनी एकच कल्ला करत हात उंचावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT