मुंबई : गुंतवणुकीसह कर्जाच्या आमिषाने एका वयोवृद्ध व्यावसायिकाची 60 कोटी 48 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला व्यावसायिक आणि सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याची आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पाच तास चौकशी केली. या चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले, मात्र त्याला चौकशीला पुन्हा हजर राहण्याचे समन्स देण्यात आले आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल होताच राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याविरुद्ध पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केले होते. त्यानंतर त्याची सोमवारी पहिल्यांदा चौकशी करण्यात आली आहे. एका खासगी कंपनीचे संचालक असलेल्या तक्रारदार वयोवृद्धाची राजेश आर्या या व्यक्तीमार्फत शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याशी ओळख झाली होती. यावेळी त्यांनी बेस्ट डिल या गृहखरेदी आणि ऑनलाईन रिटेल प्लॅटफॉर्मचे संचालक असल्याचे सांगून त्यांच्याकडे 75 कोटींच्या कर्जाची मागणी केली होती. या गुंंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कंपनीच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.
एप्रिल 2015 रोजी त्यांनी शेअर सबस्क्रिशन करारातंर्गत 60 कोटी 48 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र कुठलाही परतावा दिला नाही. हा प्रकार लक्षात येताच तक्रारदारांनी जुहू पोलिसांत शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.