मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार राजभवनात नैसर्गिक शेतीवर कार्यशाळा पार पडली. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत हे एका कसलेल्या शिक्षकाच्या भूमिकेत नैसर्गिक आणि जैविक शेतीमधील फरक सांगत होते, तर समोर बसलेले मंत्री आणि आमदार आज्ञाधारक विद्यार्थ्याच्या भूमिकेत होते. शेतकरी समस्या आणि हवामान बदलाच्या समस्यांवर नैसर्गिक शेती हाच उपाय असल्याची आग्रही भूमिका यावेळी राज्यपालांनी मांडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी राजभवन येथे राज्य मंत्रिपरिषदेचे सदस्य व विधानमंडळाच्या सदस्यांसाठी नैसर्गिक शेती विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार, मुख्य सचिव राजेश कुमार, विविध विभागांचे सचिव व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल म्हणाले की, नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन घटते हा मोठाच गैरसमज आहे. नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन वाढते व सोबतच पर्यावरण रक्षणदेखील होते. नैसर्गिक शेतीमध्ये समस्त प्राणिमात्रांचे कल्याण अंतर्भूत आहे. त्यामुळे नैसर्गिक शेती हे पवित्र कार्य असून ते धर्मातीत आहे असे राज्यपालांनी सांगितले. जैविक शेती म्हणजेच नैसर्गिक शेती असा अनेकांचा गैरसमज आहे. परंतु जैविक व नैसर्गिक शेतीमध्ये आमूलाग्र फरक आहे, असे त्यांनी सांगितले.
रासायनिक शेती 70 वर्षे जुनी आहे. त्यापूर्वी लोकांना कर्करोग, हृदयविकार अभावाने होत. त्याकाळी भाजी फळांना चव होती. रासायनिक खतांमुळे अन्नधान्याचे पोषणमूल्य कमी होत आहे, लठ्ठपणा वाढत आहे, भयानक रसायने पोटात जात आहेत. मातेच्या दुधातदेखील रसायने दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. जमिनीतील पाण्यात कीटकनाशक जात आहेत. पावसाचे पाणीदेखील विषयुक्त होत आहे. विदेशातून हजारो कोटी रुपयांची खते आणून आपण आपलेच अन्नधान्य विषमिश्रित करीत आहोत याकडे त्यांनी लक्ष वेधले.
हरित क्रांती त्यावेळची गरज होती. परंतु आज रसायनांमुळे जमीन वाळवंट होत आहे, लोकांचे आरोग्य बरबाद होत आहे, असे सांगून आज लहान मुलेदेखील हृदयविकाराने दगावत असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात नैसर्गिक शेतीचे हब तयार करणार : मुख्यमंत्री
राज्यपाल देवव्रत यांच्या अभ्यासपूर्ण विवेचनातून प्रेरणा घेऊन गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला नैसर्गिक शेतीचे हब करण्याचे कार्य राज्यात केले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नैसर्गिक शेतीला चालना देण्याचे व्रत हाती घेतले आहे. नीती निर्धारण करणाऱ्या विधायकांना नैसर्गिक शेतीचा विचार पटवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार नैसर्गिक शेती या विषयावरील परिषदेचे आयोजन केले आहे, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
रासायनिक शेतीमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले ः शिंदे
पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिले आहे. आपण स्वतः प्रगतिशील शेतकरी असून आपल्या शेतात अनेक नवनवे प्रयोग करीत असल्याचे सांगून नैसर्गिक शेती ही समाजाची व देशाची गरज आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. आज अन्नधान्याला पूर्वीसारखी चव राहिली नाही. रासायनिक शेतीमुळे कर्करोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अनेक आजार विषयुक्त अन्नामुळे होत आहेत. नैसर्गिक शेतीमुळे अन्न विषमुक्त व अमृतयुक्त होईल, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.