मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाने दांडी मारली असली, तरीही तापमानात मात्र घट झाल्याचे सांताक्रुझ वेधशाळेच्या साप्ताहिक फोरकास्टमध्ये सांगण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेला ग्रीन अलर्ट कायम असल्याने मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने सध्या उघडीप दिली आहे. मुंबईत सध्या दिवसभर पावसाची तुरळक सर पडते, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
दिवसामागून दिवस कोरडे जात असल्याने मुंबईत सध्या कमाल तापमान तिशीखाली आले आहे. सांताक्रुझ वेधशाळेमध्ये रविवारी किमान 26 आणि कमाल 29 अंश सेल्सिअस तापमान होते. शनिवारच्या तुलनेत (24/30 अंश सेल्सिअस) किमान तापमानात वाढ, तर कमाल तापमानात घट झाली.
सोमवारीही रविवारचीच पुनरावृत्ती अपेक्षित आहे. मात्र, मंगळवारी पारा पुन्हा तिशीवर पोहोचेल, असा अंदाज सांताक्रुझ वेधशाळेने वर्तवला आहे. सध्या उकाड्यात वाढ कायम आहे. रविवारी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 85 टक्के इतके होते.