Railway Platform Ticket Ban Pudhari
मुंबई

Railway Platform Ticket Ban: चेंगराचेंगरीच्या धास्तीने रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटावर बंदी

रेल्वे स्थानकांवरील गर्दी नियंत्रित करून प्रवाशांची सुरक्षितता राखण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आल्याची माहिती.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: दिवाळी आणि छठपूजेच्या निमित्ताने महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या गर्दीमुळे कोणतीही अनपेक्षित दुर्घटना किंवा चेंगराचेंगरी होऊ नये, या भीतीने पश्चिम रेल्वे प्रशासनाने अत्यंत कडक पाऊल उचलले आहे.

सुरक्षेचा उपाय म्हणून सहा प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटाच्या विक्रीवर १५ नोव्हेंबर २०२६पर्यंत तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. मध्य रेल्वेनेही सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे आणि कल्याण स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट बंदी कायम ठेवली आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांमुळे रेल्वे सेवेवर मोठा ताण आला आहे.

प्लॅटफॉर्म , पादचारी पूल आणि प्रवेशद्वारांवर मोठी गर्दी होत आहे. प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या नातेवाईक आणि मित्रमंडळींमुळे या गर्दीत प्रचंड भर पडते.

यापूर्वी अशीच गर्दी होऊन चेंगराचेंगरी झालेल्या घटना आहेत. त्यामुळे गर्दीची कोंडी फोडण्यासाठी वांद्रे टर्मिनस, वापी, वलसाड, उधना, सुरत आणि भेस्तान या स्थानकांवर केवळ अधिकृत तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

मात्र, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि दिव्यांग प्रवाशांना मदत करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना या कडक निर्बंधातून आवश्यकतेनुसार सूट देण्यात येणार आहे.

स्थानकांवरील संभाव्य धोके आणि चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रवाशांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT