मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील आमदार अपात्रताप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांत निर्णय घ्या आणि मंगळवारपर्यंत सुनावणीचे वेळापत्रक सादर करा, असे निर्देश दिले असले तरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मात्र न्यायालयाने असे काहीही म्हटले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत माझ्याकडे तसेच ऑनलाईन उपलब्ध आहे. त्यामध्ये दोन महिन्यांत निकाल किंवा इतक्या दिवसांत वेळापत्रक द्या, असे कुठेही म्हटलेले नाही. न्यायालयाला योग्य ती कारवाई अपेक्षित आहे आणि ती आम्ही लवकरात लवकर करू, नार्वेकर यांनी म्हटले आहे. असे सर्वोच्च न्यायालयाच्या । निर्णयानंतर नार्वेकर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, न्यायालयाने नोटीस जारी करण्याचा मुद्दा दिला आहे. यापुढची सुनावणी संदर्भातील कारवाई कायदेशीर सल्ला घेऊनच केली जाईल. निकाल कधी दिला पाहिजे याबाबत कोण काय म्हणते याकडे मी लक्ष देत नाही. आज माझ्याकडे आदेशाची प्रत आहे, ती ऑनलाईनही उपलब्ध आहे. ती वाचून पाहा. त्या आदेशात वर्तमानपत्रांमध्ये केलेल्या टीकेचा न्यायालयाच्या आदेशात उल्लेख नाही. ज्या गोष्टींचा आदेशात उल्लेख नाही त्यांची दखल घेणे मी योग्य समजत नाही, असे मत नार्वेकर यांनी व्यक्त केले.
अध्यक्ष हे वैयक्तिक पद नसते. अध्यक्षांचा अवमान करणे उचित वाटणाऱ्यांना शुभेच्छा, अशा शब्दात नार्वेकर यांनी टीका करणाऱ्यांना उत्तर दिले. आरोप न्यायप्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी केले जात असतात. पण अशा गोष्टीमुळे मी प्रभावित होत नाही, असेही ते म्हणाले.
आपल्या संविधानात न्यायमंडळ, विधीमंडळ आणि कार्यकारी मंडळ या तिघांनाही समान स्थान दिले आहे. कुणीही इतर कुणापेक्षा वरिष्ठ नाही, असे नार्वेकर म्हणाले. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा आणि न्यायालयाचा मान राखला जाईल, असेही त्यांनी सांगितले.