मुंबई ः राज्यातील प्रकल्प इतरत्र जाऊ देणार नाही, गोरगरिबांच्या व सरकारच्या जमिनी अदानींना देणार नाही, असे सरकार राज्यात स्थापन करण्यासाठी मतदान करा, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी मुंबईतील बीकेसी येथे महाविकास आघाडीच्या ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा’ या पहिल्या संयुक्त प्रचारसभेस संबोधित करताना केले. धारावीची कोट्यवधीची जमीन अदानी समूहाला सोपवली जात असल्याबद्दल त्यांनी महायुती, भाजप आणि नरेंद्र मोदी सरकारला धारेवर धरले. याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘लोकसेवेची पंचसूत्री’ या नावाने महाविकास आघाडीचा जाहीरनामा जाहीर केला.
राज्यातील जनतेने निवडलेले इंडिया आघाडीचे सरकार भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चोरले. ‘ईडी’, ‘सीबीआय’सारख्या यंत्रणांचा वापर करण्यात आला. तुमचे आमदार विकत घेतले गेले. तुमचे सरकार पाडण्यात आले. हे केवळ दोन-तीन अब्जाधीशांच्या मदतीसाठी केले गेले. धारावीची गोरगरिबांची 1 लाख कोटींची जमीन हिसकावून अदानी समूहाला दिली जात आहे. महाराष्ट्रातील आयफोन प्रकल्प, सेमीकंडक्टर प्रकल्प, टाटा एअर बस प्रकल्प यासारखे प्रकल्प चोरण्यात आले. लोकांचे रोजगार व उत्पन्न पळविण्यात आले. हे भाजपच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे घडले. त्यांना राज्यातील जनतेने धडा शिकवायला हवा, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.
राज्यात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आज महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. राज्यातील महागाई, पेट्रोल, गॅस, डिझेल यांची भाववाढ हे सारे घटक लक्षात घेऊन अभ्यास केल्यावर हे लक्षात येते की, राज्यातील प्रत्येक कुटुंबाची दरवर्षी 90 हजार रुपयांची लूट होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
राज्यात सत्तेत आल्यावर जातनिहाय जनगणना केली जाईल. काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटक व तेलंगणात अशी जातनिहाय जनगणना केली जात आहे. तेलंगणात आम्ही ऐतिहासिक प्रयोग जनगणनेबाबत केला आहे. जनगणना करताना कोणते प्रश्न विचारायला हवे, हे आम्ही लोकांनाच विचारले. सरकारी कार्यालयांत बसून प्रशासकीय अधिकार्यांनी हे प्रश्न ठरविले नाहीत, असेही ते म्हणाले.
लाडकी बहीण योजनेंतर्गत सध्या महिलांना दीड हजार रुपये दिले जात आहेत. ही रक्कम महालक्ष्मी योजनेंतर्गत दुप्पट करून दरमहा तीन हजार रुपये करण्यात येईल. राज्यातील महिलांना एस.टी.मध्ये मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशा घोषणा गांधी यांनी करताच सभास्थळी टाळ्यांचा कडकडाट झाला. जातनिहाय जनगणनेच्या हमीचा समावेशही पंचसूत्रीत करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी शेतकर्यांचे तीन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करणार, अशी घोषणा केली. नियमित कर्ज भरणार्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहन म्हणून देण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
‘मविआ’चे सरकार असताना आम्ही शेतकर्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले. आम्ही जे बोलतो ते करतो आणि करतो तेच बोलतो. आता आम्ही 3 लाखांपर्यंतचे कर्ज माफ करू. मुलींप्रमाणेच मुलांनाही मोफत उच्च शिक्षण देऊ, अशा घोषणा ठाकरे यांनी केल्या. बेरोजगार तरुणांना दरमहा चार हजारांपर्यंत मदत केली जाईल, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. तसेच, राज्यातील प्रत्येक कुटुंबाला 25 लाखांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण आणि मोफत औषधे दिली जातील, अशी घोषणा खर्गे यांनी केली.
लाडक्या बहिणींना दरमहा
तीन हजार रुपये देणार
शेतकर्यांचे कर्ज माफ करणार
बेरोजगारांना दरमहा चार हजार रुपये
महिलांना एस.टी.तून मोफत प्रवास