Rahul Gandhi expresses deep sorrow over Ajit Pawar demise
नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (दि. २८) सकाळी विमान अपघातात निधन झाले. या आकस्मिक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. देशभरातून प्रमुख राजकीय नेते या घटनेवर हळहळ व्यक्त करत आहेत. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 'एक्स' पोस्टवर अजित पवारांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवारजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आज विमान अपघातात निधन झाल्याचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. या शोकसागरात मी महाराष्ट्रातील जनतेच्या सोबत आहे. संपूर्ण पवार कुटुंब आणि त्यांच्या प्रियजनांप्रती या दु:खाच्या प्रसंगी मी माझ्या संवेदना व्यक्त करतो."
अजित पवार यांना घेऊन येणाऱ्या खासगी विमानाचा बारामती एमआयडीसी परिसरातील विमानतळावर उतरत असताना अपघात झाला. या दुर्घटनेत विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यात आज अजित पवार यांच्या चार प्रचारसभा होणार होत्या. त्यासाठी ते मुंबईहून सकाळी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. विमान बारामती विमानतळावर उतरण्याच्या प्रक्रियेत असतानाच तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण तपासाअंतीच स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.