Congress Pudhari
मुंबई

Congress Delhi Protest: राहुल गांधींच्या लोकशाही बचाव आंदोलनात महाराष्ट्र काँग्रेसचे नेते दिल्लीत रस्त्यावर

हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांच्यासह नेत्यांचा सहभाग; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अटकेची सपकाळ यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही बचाओ आंदोलनात प्रदेश काँग्रेसचे प्रभारी डॉ. प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यातील सर्व नेते दिल्लीच्या रस्त्यावर सोमवारी आंदोलनात उतरले.

दिल्लीतील लोकशाही बचाव आंदोलनात महाराष्ट्रातून प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, नसीम खान, माजी मंत्री नितीन राऊत, अमित देशमुख, विश्वजित कदम, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, हुसेन दलवाई यांच्यासह राज्यातील नेते व आमदार यांनी उपस्थित राहून सहभाग घेतला. दिल्लीच्या कोपरनिकस मार्गावरून पदयात्रा करत महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सर्वोच्च न्यायालयाकडे निघाले होते.

काँग्रेस व इंडिया आघाडीने मत चोरीचा मुद्दा मांडत देशभर आंदोलन सुरू केले आहे. ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे, लोकशाहीच्या मार्गाने सुरू असलेला हा लढा मोडीत काढण्याचा चंग हुकूमशहाने बांधला आहे म्हणूनच राजधानी दिल्लीला लष्करी छावणी बनवले.

दिल्लीला येणाऱ्या २५० रेल्वे बंद करण्यात आल्या आहेत, तर मेट्रोही बंद करण्यात आलेली आहे. आंदोलन दडपून मत चोरी लपवण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु, जोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT