Devendra Fadnavis Constituency Voter Increase Claim
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत वृत्तपत्रात लेख लिहून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला काही प्रश्न उपस्थित केले होते. तर दुसरीकडे यावरून सत्ताधारी भाजपकडून आणि मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी उत्तर दिले होते. तर आता राहुल गांधी यांनी थेट फडणवीस यांच्या मतदारसंघात वाढलेल्या मतदानाचा मुद्दा एक्सवर उपस्थित करून मोठा दावा केला आहे.
गांधी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात केवळ ५ महिन्यांत मतदार यादीत ८ टक्के मतांची वाढ झाली आहे. काही मतदान केंद्रांवर २० टक्के ते ५० टक्के पर्यंत मतांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांनीही अनोळखी लोकांनी मतदान केल्याचे सांगितल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
हजारो मतदारांचे पत्ते हे अयोग्य पद्धतीचे असल्याचे माध्यमांनीही स्पष्ट केले आहे. यावर निवडणूक आयोग शांत का आहे? असा सवाल करून या सगळ्यांमध्ये निवडणूक आयोग सहभागी आहे का ?, हे अपघाती नाही, हे थेट मतांची चोरी आहे. त्यामुळे मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि CCTV फुटेज तातडीने प्रसिद्ध करा, अशी मागणी राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये केली आहे.