Chandrashekhar Bawankule on Rahul Gandhi
मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना 'मी त्यांना भेटलो आहे, त्यांच्यासोबत खोलीत बसलो आहे. त्यांचा फक्त दिखावा आहे, ताकद नाही,' असे सांगत 'फुगा' असा उल्लेख केला होता. राहुल गांधी यांच्या टीकेला भाजपचे नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी शो नाहीत, ते विकासाचा रोड शो आहेत, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
"राहुल गांधी यांनी कायम लक्षात ठेवायला हवे की, पंतप्रधान मोदी म्हणजे दिशा तर राहुल गांधी म्हणजे दिशाभूल आहेत, हे देशातील जनतेने ओळखले आहे. मोदींना 'फुगा' हा शब्द वापरताय, पण जनतेने निवडणुकीत १० वेळा तुमच्या पक्षाचा ‘हवेचा फुगा’ फोडला आहे. राहुल गांधी, हा देश तुमच्या भाषणांवर चालत नाही. तो आकड्यांवर, कामांवर आणि जनतेच्या विश्वासावर चालतो. पंतप्रधान मोदी यांच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताने विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात भक्कम झेप घेतली आहे. देशातील तब्बल २५ कोटी लोकांना गरिबीच्या रेषेतून वर काढण्यात यश मिळालं आहे. केंद्रातील मोदी सरकारने ८० कोटींहून अधिक नागरिकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली. ही फक्त आकडेवारी नाही, तर कोट्यवधी कुटुंबांच्या आयुष्यात घडलेली क्रांती आहे. देशाच्या १४० कोटी जनतेनं सलग तिसऱ्यांदा मोदींवर विश्वास ठेवला, पूर्ण बहुमत दिले. त्या नेत्याबद्दल अशी भाषा वापरणे म्हणजे लोकशाहीचा, जनतेचा अपमान आहे. राहुल गांधी, तुमची टीका म्हणजे राजकीय अपरिपक्वतेच, नैराश्याच आणि त्यांच्या अपयशाच जिवंत उदाहरण आहे," असे बावकुळे म्हणाले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी असा दावा केला की ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनेक वेळा भेटले आहेत आणि त्यांच्याकडे ताकद नाही. त्यांनी काँग्रेसच्या 'ओबीसी पार्टिसिपेशन जस्टिस कॉन्फरन्स'मध्ये ही टिप्पणी केली. तसेच, त्यांचा पक्ष सत्तेत असताना जातीय जनगणना करू शकला नाही ही त्यांची चूक असल्याचे ते म्हणाले. राहुल गांधींनी त्यांच्या भाषणादरम्यान विचारले की देशातील सर्वात मोठी समस्या कोणती आहे, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने पंतप्रधान मोदी यांचे नाव घेतले. यावर राहुल गांधी म्हणाले, "नरेंद्र मोदी ही मोठी समस्या नाही. मीडियाने फक्त फुगा बनवला आहे. मी त्यांना भेटलो आहे, त्यांच्यासोबत खोलीत बसलो आहे. हा फक्त 'दिखावा' आहे, ताकद नाही."