Radhakrishna Vikhe Patil
मुंबई : सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. हे अनेक वर्ष काम चालू आहे, असे वादग्रस्त विधान मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले आहे. पंढरपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. आपली चूक लक्षात येताच त्यांनी लगेच सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
सारवासारव करताना विखे-पाटील म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहोत. महायुती सरकारने जाहीर केल्याप्रमाणे शंभर टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार."
या वादग्रस्त वक्तव्यानंतर शेतकरी नेते अजित नवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली. विखे पाटलांचे हे वक्तव्य ऐकून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातील येणारी उदाहरणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सरकारला शेतकऱ्यांच्या मतांसाठी आश्वासन देणे आणि अशा प्रकारे वागणे चालते. मात्र, सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफी करायची नसल्यामुळेच सरकारकडून असे आढेवेडे घेतले जात आहेत. शेतकरी आंदोलनाच्या दबावामुळे आता सरकारला नाईलाजास्तव कर्जमाफी करावी लागत आहे. शेतकरी संघटनांची, नेत्यांची आणि शेतकऱ्यांची एकजुट झाली असल्यामुळे, सरकारला झुकावे लागेल आणि कर्जमाफी करावी लागेल, असे ते म्हणाले.
नवले यांनी या कर्जमुक्तीच्या मागणीला 'लूट वापसी' असे म्हटले. शेतकरी हे कर्जमुक्ती स्वाभिमानाने मागत आहेत, कारण ज्यावेळी पीक आले त्यावेळी सरकारने लुटले होते, आणि आता ती लुटीची वापसी म्हणून कर्जमुक्ती करावी लागेल. यापुढे मत देणाऱ्यांनी निवडणुकांमध्ये विचार करूनच मत दिली पाहिजेत. विविध पक्ष जे जाहीरनामे काढतात, ते सत्तेवर आल्यानंतर त्यांच्यावर बंधनकारक राहतील अशा प्रकारची काही तरतूद निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.