मुंबई : सीबीएसईच्या बारावीच्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत उत्तरपत्रिकांची अदलाबदल झाल्याच्या वादानंतर आता विद्यार्थी वेदांत श्रीवास्तवच्या ‘तपासलेल्या’ भौतिकशास्त्र उत्तरपत्रिकेत ‘हस्तलिखित’ तपासणीच्या खुणा आढळल्याने ऑन स्क्रीन मार्किंग (ओएसएम) प्रणालीच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
वेदांत श्रीवास्तव याने यापूर्वी पुनर्मूल्यांकनासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली उत्तरपत्रिका स्वतःची नसल्याचा आरोप केला होता. हस्ताक्षर, उत्तरांची मांडणी आणि लिहिण्याची शैली स्वतःच्या उत्तरपत्रिकेशी जुळत नसल्याचे त्याने समाजमाध्यमांवर नमूद केले होते. या प्रकरणानंतर सीबीएसईने उत्तरपत्रिकांची अदलाबदल झाल्याची कबुली देत त्याला योग्य उत्तरपत्रिका उपलब्ध करून दिली. मात्र, वेदांतने समाजमाध्यमांवर शेअर केलेल्या नव्या स्क्रीनशॉटमुळे आणखी एक वाद निर्माण झाला आहे.
या उत्तरपत्रिकेवर लाल शाईतील टिकमार्क, हाताने गोल केलेले गुण, प्रश्न क्रमांकांवरील खूणा, स्लॅश चिन्हे आणि हस्तलिखित निरीक्षणे स्पष्टपणे दिसत आहेत. या खुणा पारंपरिक हस्तलिखित तपासणीसारख्या असल्याने सीबीएसईने सार्वजनिक वादानंतर प्रत्यक्ष हाताने पुनर्तपासणी केली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सीबीएसईने यंदा उत्तरपत्रिकांचे डिजिटल मूल्यांकन करण्यासाठी ओएसएम प्रणाली लागू केली आहे. या पद्धतीत उत्तरपत्रिका स्कॅन करून परीक्षक संगणकीय माध्यमातून मूल्यांकन करतात. सामान्यतः प्रत्यक्ष उत्तरपत्रिकेवर लाल शाईतील टिपणे किंवा गुणांकन केले जात नाही. त्यामुळे वेदांतच्या उत्तरपत्रिकेत दिसून आलेल्या हस्तलिखित खुणांमुळे डिजिटल मूल्यांकन प्रक्रियेच्या सुसंगततेवर संशय व्यक्त होत आहे.
यंदाच्या निकाल प्रक्रियेदरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी स्कॅन प्रत अस्पष्ट असणे, काही पाने गायब असणे, योग्य उत्तरांना गुण न मिळणे तसेच उत्तरपत्रिका दुसऱ्याची असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.
त्यामुळे सीबीएसईच्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेवर आणि ओएसएम प्रणालीच्या विश्वासार्हतेवर व्यापक चर्चा सुरू झाली आहे. वेदांतनेही योग्य उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर समाधान व्यक्त केलेले नसून काही उत्तरांना अपेक्षित गुण मिळाले नसल्याचा दावा करत पुढील पुनर्मूल्यांकनाची भूमिका कायम ठेवली आहे.
वेदांतने शेअर केलेल्या उत्तरपत्रिकेच्या स्कॅन प्रतीत लाल शाईतील टिकमार्क, हाताने गोल केलेले गुण, प्रश्न क्रमांकांवरील खूणा व हस्तलिखित निरीक्षणे स्पष्ट दिसत आहेत. ओएसएम प्रणालीत सामान्यतः डिजिटल माध्यमातून मूल्यांकन केले जाते. त्यामुळे ही उत्तरपत्रिका पारंपरिक पेन-आधारित तपासणीप्रमाणे दिसत असल्याने सीबीएसईने सार्वजनिक वादानंतर हस्त तपासणी केली का, याबाबत समाजमाध्यमांवर चर्चा सुरू झाली आहे.