मुंबई : गृहनिर्माण प्रकल्पांच्या सर्व प्रकारच्या जाहिरातींसोबत क्यूआर कोड असणे आता अत्यावश्यक राहणार आहे. हा नियम 1 ऑगस्टपासून लागू होणार आहे. मार्च अखेरपासून नव्याने नोंदणी करणार्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांना नोंदणी पत्रासोबतच प्रकल्पांचा समग्र तपशील असलेले क्यूआर कोडही द्यायला महारेराने सुरुवात केली आहे.
नोंदणीकृत जुन्या प्रकल्पांनाही महारेराने क्यूआर कोड उपलब्ध करून दिले आहेत. या क्यूआर कोडमुळे घर खरेदीदारांना या प्रकल्पाशी संबंधित अत्यंत महत्त्वाची सर्व प्राथमिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. घर खरेदीदार किंवा स्थावर संपदा क्षेत्रात गुंतवणूक करणार्या कुणालाही संबंधित प्रकल्पाबाबत विविध प्रकारची माहिती हवी असते. यात प्रकल्पाचे नाव, विकासकाचे नाव, प्रकल्प कधी पूर्ण होणे अपेक्षित आहे, प्रकल्प कधी नोंदवला गेला, प्रकल्पाविरुद्ध काही तक्रारी आहेत का, प्रकल्पाच्या विविध मंजुर्या, असा सर्व तपशील क्यूआर कोडमुळे एका क्लिकवर सहजपणे उपलब्ध होणार आहे.