pyare khan warns nitesh rane muslim remark 2025
नागपूर : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी मंत्री नितेश राणे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना प्यारे खान यांनी राणेंना इशारा देत म्हटले की, "मुस्लिमांविरोधात वक्तव्य करण्यापूर्वी त्यांनी माहिती घ्यावी की, पर्यटकांच्या जीवाचे रक्षण करणारे कोण होते आणि कोणत्या धर्माचे होते."
पुढे प्यारे खान म्हणाले, "सध्या कश्मीरमध्ये मुस्लिम बांधव पर्यटकांचे संरक्षण करत आहेत. ते बंदूक पाठीवर घेऊन पर्यटकांना सुरक्षित स्थळी पोहोचवत आहेत. संकटसमयी जीव धोक्यात घालून मदत करणारे हेच मुस्लिम आहेत. त्यामुळे, अशा कठीण परिस्थितीत देखील मदतीचा हात देणाऱ्या समाजाविरोधात वक्तव्य करताना काळजी घ्यायला हवी."
त्यांनी स्पष्टपणे सांगीतले की, महाराष्ट्र विधानसभेतील २८८ आमदारांपैकी नितेश राणे हेच एकमेव आमदार आहेत, जे देश तोडण्यासारखी भाषा करतात. "दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देश जोडण्याचे काम करत आहेत. देशाच्या अखंडतेसाठी प्रत्येक भारतीय एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहे," असे प्यारे खान यांनी ठामपणे सांगितले.
प्यारे खान यांनी पुढे बोलताना सांगितले की, "देशातील मुस्लिम समाज देखील देशाच्या अखंडतेसाठी कटिबद्ध आहे. सध्याच्या काळात काश्मीरमधील मुस्लिमांनी पर्यटकांना जीव वाचवण्यासाठी मदत केली आहे आणि पाकिस्तानविरोधातही संताप व्यक्त केला आहे." त्यांनी स्पष्ट केले की, "ही वेळ कोणत्याही धर्मावर टीका करण्याची किंवा राजकीय पोळी भाजण्याची नाही, तर संकटकाळात एकमेकांना आधार देण्याची आहे."
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर टीका करताना प्यारे खान बोलले की, "नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विकास कामांवर लक्ष केंद्रित करावे. तेढ निर्माण करणाऱ्या विधानांपेक्षा विकासकामातून नेतृत्व सिद्ध करावे. जर हिंदूंचा नेता व्हायचे असेल, तर जनतेच्या भल्यासाठी काम करून दाखवा."
राजकारणात टिकून राहण्यासाठी समाजात तेढ निर्माण करणे हा चुकीचा मार्ग आहे, असेही त्यांनी बजावले. विकासकामे, रोजगारनिर्मिती, शिक्षण व आरोग्य सेवा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे यालाच खरे नेतृत्व म्हणतात, असा सल्ला त्यांनी दिला.
त्यांच्या या परखड आणि थेट विधानांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळे नितेश राणे यांच्या भूमिकेवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.