डॉ. स्मिता योगेश जाधव. Pudhari News
मुंबई

Dr. Smita Yogesh Jadhav : डॉ. स्मिता योगेश जाधव यांना पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी

Pune Graduate Constituency Election : शिक्षण, माध्‍यम आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदानाची दखल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून डॉ. स्मिता जाधव यांची ओळख आहे. त्या ‘पुढारी’च्या संचालक असून पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू आहेत. शिक्षण, मीडिया आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी नेतृत्वाची भूमिका बजावलेली आहे.

शिक्षण, माध्‍यम आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान

शिक्षण, माध्यम आणि सामाजिक क्षेत्रांत दूरदृष्टीने कार्यरत असलेले नेतृत्व अशी डॉ. स्मिता योगेश जाधव यांची ओळख आहे. बी.ई., एम.बी.ए. आणि पीएच.डी. या पदव्यांसह उच्चविद्याविभूषित असलेल्या डॉ. स्मिता जाधव यांनी विविध क्षेत्रांमध्ये आपली प्रभावी कामगिरी केली आहे आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या सचिव अशी भूमिका बजावणाऱ्या डॉ. स्मिता जाधव एक सर्जनशील, कल्पक आणि परिवर्तनकारी धोरणांनी शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन बदल घडवून आणणारे नेतृत्व म्हणून डॉ. स्मिता यांच्याकडे पाहिलं जातं. शिक्षण क्षेत्रामध्ये भविष्यवेधी, सर्वसमावेशक आणि जागतिक दर्जाचे शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.

'पुढारी पब्लिकेशन'च्या संचालक म्‍हणून सक्रीय

डॉ. स्मिता योगेश जाधव शिक्षण क्षेत्राबरोबरच अन्य क्षेत्रांमध्येसुद्धा कार्यरत आहेत. 'पुढारी पब्लिकेशन'च्या संचालक म्हणून माध्यम क्षेत्रामध्येसुद्धा त्या सक्रिय आहेत. 'टोमॅटो ९४.३ एफएम' आणि 'आपलं एफएम ९१.९' च्या कार्यकारी संचालक म्हणून काम करताना दोन्ही एफएम चॅनेल्स लोकप्रिय करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

महिला सक्षमीकरणासाठी प्रभावी कामगिरी

डॉ. स्मिता जाधव यांनी 'पुढारी कस्तुरी क्लब'च्या अध्यक्षा म्हणूनसुद्धा महिला सक्षमीकरणासाठी प्रभावी कामगिरी बजावली आहे. त्यांनी कस्तुरी क्लबच्या माध्यमातून १८ हजारांहून जास्त महिलांचे नेटवर्क उभारले आहे. महिलांना सामाजिक सहभाग, नेतृत्व तसेच उद्योजकतेसाठी प्रोत्साहन दिले आहे. शिक्षणतज्ज्ञ, उद्योजिका आणि सामाजिक कार्याबद्दल त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानितसुद्धा करण्यात आले आहे. महिलांच्या उन्नतीसाठी केलेल्या विशेष योगदानाबद्दल त्यांना 'वेणूताई चव्हाण युवती पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले होते. शिक्षण क्षेत्रातील प्रभावी आणि मोलाच्या कामगिरीबद्दल 'भारत सन्मान निधी पुरस्कार' त्यांना देण्यात आला. महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेण्यात आली आणि त्यांना 'बेस्ट वुमन ग्रुप अँड वुमन एमपावरमेंट पुरस्कार' देण्यात आला. याशिवाय 'ग्लोबल वुमन इन्स्पिरेशन अवॉर्ड', शिक्षणातील नाविन्यपूर्ण आणि अत्याधुनिक दृष्टिकोनासाठी 'एजुपायोनियर ऑफ द इयर', 'आउटस्टँडिंग लीडरशिप इन हायर एज्युकेशन', 'हायर एज्युकेशन टेक कॉन्क्लेव्ह अवॉर्ड' आणि प्रशासकीय कौशल्याबद्दल 'बेस्ट सीईओ प्राइड ऑफ इंडिया अवॉर्ड' आदी पुरस्कारांनी डॉ. स्मिता जाधव यांना गौरवण्यात आले आहे.

डॉ. स्मिता जाधव नव्या भूमिकेसाठी सज्ज

डॉ. स्मिता जाधव यांना शिक्षण क्षेत्रातील कार्याचा वारसा आजोबा शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, वडील कुलपती डॉ. पी. डी. पाटील आणि आई प्र-कुलगुरू डॉ. भाग्यश्री पाटील यांच्याकडून मिळाला, तर मीडिया आणि सामाजिक क्षेत्रातील कामासाठी सासरे पत्रमहर्षी आणि 'पुढारी'चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव आणि पती 'पुढारी'चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव तसेच त्यांच्या कुटुंबाकडून प्रेरणा आणि मोलाची साथ मिळाली आहे. ज्या क्षेत्रात त्यांनी कामाला सुरुवात केली, त्यात त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली आणि अशा या कर्तृत्वाची छाप पाडणाऱ्या डॉ. स्मिता जाधव आता नवीन जबाबदारीसाठी सज्ज झाल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT