‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन तथा समूह संपादक डॉ. योगेश जाधव 
मुंबई

Pudhari Mahasummit 2026| ‘आवाज जनतेचा’ या ब्रीदवाक्याला अनुसरूनच तीन वर्षांची वाटचाल

डॉ. योगेश जाधव यांचे प्रतिपादन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : ‘आवाज जनतेचा’ या ब्रीदवाक्याला अनुसरूनच या तीन वर्षांत काम करत आम्ही सातत्याने जनतेचे प्रश्न मांडण्याचे काम केले आहे. ‘पुढारी न्यूज’च्या पत्रकारितेचा इम्पॅक्ट आज सर्वत्र जाणवत आहे, असे प्रतिपादन ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन तथा समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांनी केले.

‘पुढारी न्यूज’च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी ‘पुढारी न्यूज महासमिट -२०२६’चे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. दक्षिण मुंबईतील ट्रायडेंट हाॅटेलमधील सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस यांनी दीपप्रज्वलन करून दिवसभर चाललेल्या महाचर्चेचा शुभारंभ केला. या उद्‌घाटन सोहळ्यास व्यासपीठावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन इमेरिटस्‌ आणि मुख्य संपादक पद्मश्री प्रतापसिंह जाधव, ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन तथा समूह संपादक योगेश जाधव, ‘पुढारी’च्या संचालक गीतादेवी जाधव, ‘पुढारी’च्या संचालक स्मितादेवी जाधव, ‘पुढारी’च्या संचालक शीतल पाटील, ‘पुढारी’चे संचालक ऋतुराज पाटील उपस्थित होते. यावेळी प्रतापसिंह जाधव आणि योगेश जाधव यांनी पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देत मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती होती.

आपल्या प्रास्ताविकात डॉ. योगेश जाधव यांनी ‘पुढारी न्यूज’च्या तीन वर्षांचा आढावा घेतला. ते म्हणाले, माझे वडील आणि ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन इमेरिटस्‌ आणि मुख्य संपादक पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांच्या 'पुढारी' पत्रकारितेचा वारसा ‘पुढारी न्यूज’च्या टीमने व्हिडीओ स्वरूपात डिजिटल आणि टेलिव्हिजन (टीव्ही) स्वरूपात पुढे आणला. हे आम्ही करू शकलो, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

आजच्या डिजिटल जगात टेलिव्हिजनची गरज सर्वाधिक आहे. आजच्या काळात हा एकमेव मीडिया आहे, जो ‘अल्गोरिदम’वर अवलंबून नाही. कोण काय बघणार, एखाद्याला कोणत्या बातम्या सतत दिसत राहणार याचा निर्णय अल्गोरिदम घेत असतो. त्यामुळे पूर्ण सत्य कधीच कळत नाही. नाण्याची एकच बाजू युवा पिढीसमोर येत राहते. अशावेळी ‘पुढारी न्यूज’सारखे न्यूज चॅनेल, जे अगदी परिपूर्ण आहे. एखाद्या घटनेचे सर्व कंगोरे लोकांसमोर दाखविण्याची गरज असते. यापुढे अशाच वाहिन्यांना जास्त महत्त्व असेल, असेही योगेश जाधव यांनी अधोरेखित केले.

गेल्या काही दिवसांत नव्या पिढीच्या काही मागण्या वेगाने आपल्या समोर आल्या. त्यामुळे आजच्या या ‘पुढारी महासमिट’मध्येसुद्धा जेन नेक्स्ट हा वेगळा सेगमेंट आम्ही ठेवला आहे, जेणेकरून नव्या पिढीला समजून घेता येईल, याकडे लक्ष वेधून डॉ. योगेश जाधव म्हणाले, या नव्या पिढीला हवा असणारा उद्याचा महाराष्ट्र घडवणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महासमिटला उपस्थित आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. डेटा, एआय, जीसीसीसोबतच पुढील ५० वर्षांचा विचार करून उभारलेले कोस्टल लिंक, समृद्धी महामार्ग असे अनेक प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी यशस्वी करून दाखविले. यामुळेच महाराष्ट्राच्या युवा पिढीचे भविष्य त्यांच्या हाती अगदी सुरक्षित आहे. ‘पुढारी’ समूहाने कायमच आपल्या कृतीतून भविष्याचा वेध घेतला आहे. आजचा महासमिट त्याचाच एक भाग आहे, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT