File Photo
मुंबई

नामदेव ढसाळ यांची कविता हटवा म्हणणाऱ्या सेन्सॉर बोर्ड विरोधात 'चल हल्ला बोल...'

कोण नामदेव ढसाळ? सेन्सॉर बोर्डचा सवाल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : 'चल हल्ला बोल' या मराठी चित्रपटातील महाकवी नामदेव ढसाळ यांची 'रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो...' ही कविता हटवा. तसेच कोण नामदेव ढसाळ? असा सवाल करणाऱ्या सेन्सॉर बोर्ड विरोधात 'चल हल्ला बोल' करण्याचा थेट इशारा विविध जनसंघटना आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे.

'लोकांचा सिनेमा' चळवळीच्या माध्यमातून लेखक, दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी लोक वर्गणीतून 'चल हल्ला बोल' हा सिनेमा बनवला आहे. दलित पँथर, युक्रांद या चळवळींच्या पार्श्वभूमीवर दलित, आदिवासी, भटके विमुक्त, अल्पसंख्यांक, मुस्लिम, शेतकरी, स्त्रिया आदींच्या शोषणाविरुद्ध लढ्याची भूमिका मांडणारा हा चित्रपट आहे. मात्र सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला परवानगी नाकारली आहे. सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी बोर्डाने तब्बल अकरा कट सांगितले आहेत. याबाबत बोलताना महेश बनसोडे म्हणाले की, बोर्डाने नामदेव ढसाळ यांची कविता काढा असे लेखी कळवले आहे. याबाबत बोर्डाच्या अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारला असता त्यांनी कोण नामदेव ढसाळ? आम्ही ओळखत नाही असा उर्मट सवाल केला. त्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सेन्सॉर बोर्ड जाणून बुजून बहुजन संस्कृती आणि अभिव्यक्तीवर बंदी आणत असल्यामुळे सेन्सॉर बोर्ड विरोधात मोहीम सुरू केल्याचे 'लोकांचे दोस्त' या संघटनेचे रवि भिलाणे यांनी स्पष्ट केले. या मोहिमेत लोकांचे दोस्त संघटना तसेच पत्रकार संजय शिंदे, पँथर सुमेध जाधव, लोकशाहीर संभाजी भगत, कॉमेड सुबोध मोरे, संभाजी ब्रिगेडचे प्रमोद शिंदे, दोस्त पोपट सातपुते, भानुदास धुरी आदींनी पुढाकार घेतला आहे. विविध मान्यवरांनीही या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे. लोकांचा सिनेमा चळवळीच्या माध्यमातून, सेन्सॉर बोर्डची गरज काय असा प्रश्न विचारला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT