मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत २८०० मेगावॅट क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे.टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेडसोबत राज्य सरकारने सामंजस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिली.
राज्याची स्वच्छ ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जेच्या वापरात राज्याने लक्षणीय प्रगती केली आहे. अणुऊर्जा हा सक्षम आणि महत्त्वाचा पर्याय म्हणून पुढे आला आहे. राज्याची ऊर्जेची गरज पूर्ण करताना ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवीन ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीमुळे अणुऊर्जेच्या निर्मिती क्षमतेत मोठी वाढ शक्य होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार अभिमन्यू पवार, संबंधित अधिकारी, टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेडचे प्रतिनिधी उपस्थित होते. अखंडित वीजपुरवठ्यासाठी आवश्यक मूलभूत वीजभाराचा विचार करता अणुऊर्जा हा प्रभावी आणि स्वच्छ पर्याय आहे. अणुऊर्जा क्षेत्रात राज्याने यापूर्वी केंद्र सरकारच्या तसेच खासगी कंपन्यांसोबत तीन करार केले आहेत. अमेरिकेतील प्रमुख अणुऊर्जा कंपन्यांच्या शिष्टमंडळासोबतही यासंदर्भात चर्चा झाली असून, त्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुकता दर्शविली आहे, असे फडणवीस म्हणाले.
टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड सोबत झालेल्या या दोन करारांमुळे महाराष्ट्राच्या अणुऊर्जा निर्मिती क्षमतेला आणखी बळ मिळणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेडचे अभिनंदन केले.
दोन सामंजस्य करार
करारात जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड यांच्या अणुऊर्जा प्रकल्पाचा समावेश आहे. हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील भिवबुंदर (आगरी गाव) येथे प्रस्तावित असून, त्याची क्षमता एकूण २८०० मेगावॅट इतकी आहे. प्रकल्प दोन टप्प्यांत राबविण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात १४०० मेगावॅट आणि दुसऱ्या टप्प्यात १४०० मेगावॅट क्षमतेची निर्मिती प्रस्तावित आहे. जेएसडब्ल्यू एनर्जीच्या या प्रकल्पासाठी सुमारे ४४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, पहिल्या टप्प्यासाठी २२ हजार कोटी रुपये आणि दुसऱ्या टप्प्यासाठी २२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे.