Maharashtra Politics Pudhari
मुंबई

Maharashtra Politics: ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदींचा भाजपला मिस्ड कॉल

आता भाजपच्या उपक्रमाचे कौतुक केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यसभेतील खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी ‌‘मिस्ड कॉल‌’ देत भाजपच्या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. राज्यसभेवर संधी न मिळाल्याने त्या नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच आता भाजपच्या उपक्रमाचे कौतुक केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महाविकास आघाडीच्या राजकारणातून राज्यसभेवर पुन्हा वर्णी न लागल्याने चतुर्वेदी नाराज असल्याच्या चर्चा आहे. त्यातच आता चतुर्वेदींनी मिस्ड कॉल देत नारीशक्ती वंदन अधिनियमाचे जनसमर्थन वाढविण्यासाठी भाजपने चालविलेल्या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.

चतुर्वेदींनी आपल्या मोबाईलवरून भाजपला मिस्ड कॉल देताच भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी लगोलग चतुर्वेदींचे निवासस्थान गाठून त्यांना पुष्पगुच्छ दिला. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शरद पवारांना संधी देण्यात आली.

शिवसेना ठाकरे गटाचे संख्याबळ जास्त असल्याने ही जागा पक्षाला मिळावी आणि तिथे प्रियांका चतुर्वेदींना उमेदवारी मिळावी, अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी मांडली होती. नाराज झालेल्या चतुर्वेदी भाजपच्या वाटेवर असून त्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, राज्यातील भाजपच्या सर्वोच्च नेत्यांकडून ‌‘ग्रीन सिग्नल‌’ न मिळाल्याने चतुर्वेदींच्या हाती अद्याप कमळ आलेले नाही.

चतुर्वेदी यांच्या भेटीबाबत स्वतः चित्रा वाघ यांनीच माहिती दिली. प्रियांका चतुर्वेदी यांची सदिच्छा भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या नारीशक्ती वंदन अधिनियमाला मिस्ड कॉल देऊन राजकारणापलीकडे जाऊन महिलांच्या हक्कांसाठी उभे राहणे हीच नारीशक्ती, असे वाघ यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT