मुंबई : सुरेखा चोपडे
राज्याबाहेर आणि राज्यांतर्गत धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेसचे आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत पर्यटन आणि गावी जाण्याचे बेत आखलेल्या नागरिकांना खासगी ट्रॅव्हल्स आणि विमान प्रवासाकरिता जादा पैसे मोजावे लागणार आहेत. ऑफ सीझनला अगदी स्वस्तात 'सीट' विकणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सनी दिवाळीत तिकीट दरात दीडपट वाढ केली आहे. ही दरवाढ शुक्रवार २५ ऑक्टोबरपासून लागू होत आहेत, तर दुसरीकडे विमानांच्या तिकिटातदेखील भरमसाट वाढ झाली आहे.
यंदा दिवाळीच्या सुट्या २८ ऑक्टोबरपासून सुरु होत असल्या तरी चौथा शनिवार-रविवार असल्याने २५ ऑक्टोबरपासूनच गाड्यांना गर्दी होणार आहे. यंदा २९ ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. दिवाळीच्या सुट्टीत विविध पर्यटन ठिकाणी फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. सुट्ट्यांमध्ये ट्रॅव्हल्स वाहतूक दारांना एसटीच्या दीडपट भाडे वाढविण्याची परिवहन विभागाची परवानगी आहे. परंतु ट्रॅव्हल्सचे दर दुपटीने वाढलेले आहेत. सध्या दिवसाला मुंबईत येताना एक हजार आणि परतीच्या प्रवासासाठी एक हजार अशा एकूण दोन हजार ट्रॅव्हल्स धावतात. दिवाळीच्या सुट्टयांमध्ये ट्रॅव्हल्सची संख्या तीन हजारांवर पोहोचणार आहे. २५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान राज्यात पुणे, कोल्हापूर, नागपूर आणि आंतरराज्य मार्गावर गुजरात, राजस्थानला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी आहे.
मुंबई-अहमदाबाद या मार्गाचे वातानुकूलित स्लीपर बसचे नेहमीचे तिकीट ८०० ते दीड हजार रुपयांपर्यंत आहे. दिवाळीत हेच तिकीट ३ ते ४ हजार रुपयांपर्यंत विकले जात आहे, तर मुंबई- महाबळेश्वर वातानुकूलित गाडीचे नेहमीचे तिकीट ४०० ते ६०० रुपयांपर्यंत असते, त्याचा दर ८०० ते १८०० रुपयांपर्यंत गेला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये दिवाळी सणासाठी आगाऊ फ्लाइट बुकिंगमध्ये ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गोवा आणि जयपूरसारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांचे सरासरी विमान भाडे सणासुदीच्या काळात २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत. देशांतर्गत मार्गांवर, एकेरी तिकिटांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबई ते पाटणा या मार्गाचे भाडे २० हजारांच्या पुढे गेले आहे, तर बंगळुरू ते वाराणसी २४ हजार आणि बंगळुरू ते पाटणा ३० हजार रुपयांपर्यत पोहोचले आहे. मुंबई ते लखनौ आणि दिल्ली ते गुवाहाटी यासह इतर प्रमुख मार्गावरही तिकीट दरात वाढ झाली आहे.