मंत्री प्रताप सरनाईक  file photo
मुंबई

Private office timing change : खासगी कार्यालयांच्या वेळा बदलणार?

टास्क फोर्स स्थापन : सरनाईक यांची विधानसभेत माहिती

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील उपनगरीय रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळात काही सवलती देण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर खासगी आस्थापनांच्या वेळांतील बदलांसाठी कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

दरम्यान, सामान्य लोकलच्या तिकिट दरात एसी लोकलचे तिकीट उपलब्ध करून देत जास्तीत जास्त रेल्वेगाड्या या बंद दरवाज्यांच्या करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करीत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. विधानसभेत मुंब्रा येथील रेल्वे अपघातासंदर्भात आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मंत्री सरनाईक यांनी वरील माहिती दिली.

यावेळी प्रताप सरनाईक म्हणाले की, मुंबई रेल्वे वाहतुकीवरील वाढता ताण ही वस्तुस्थिती असून ती नाकारता येत नाही. लोकल गाडी पकडण्यासाठी रेल्वे प्रवासी जीव धोक्यात घालत असून त्यातूनच मुंब्रा अपघातासारखी घटना घडली. मुंबईत गेल्या तीन वर्षातील विविध रेल्वे अपघातात 7 हजार 565 प्रवाशांचा मृत्यू झाला असून सुमारे 7 हजार 200 प्रवासी जखमी झाले आहेत. ही बाब भूषणावह नाही. या घटना कमी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून विविध प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठीच उपनगरीय रेल्वेला मेट्रो रेल्वे, जलवाहतूक, पॉड टॅक्सी यासारखे विविध पर्यायी वाहतूक मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

दरम्यान, खासगी आस्थापनांतील कामगारांच्या वेळेत बदल करण्यासंदर्भात लवकरच टास्कफोर्स निर्माण केले जाणार आहे. त्याशिवाय सरकारी आस्थापनांतील कर्मचार्‍यांना अर्धा तास उशिराने येऊन अर्धा तास उशिरापर्यंत काम करण्याची मुभा देण्यात आल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. तर बंद दरवाजांच्या रेल्वेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करीत असून लवकरच त्याबाबत निर्णय होईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. तर याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालीही लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT