मुंबई : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर आवश्यक कलमे लावून योग्य ती कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत स्पष्ट केले.
प्रवीण गायकवाड यांना गाडीतून बाहेर खेचून पाडण्यात आले, काळे फासण्यात आले. हा त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न होता, असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. संबंधित आरोपी एका पक्षाचा कार्यकर्ता असून, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्यावर पिस्तूल बाळगल्याचा गुन्हा आहे. त्याने चुलत भावाची हत्या केली म्हणून तुरुंगवासही भोगला आहे. त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
यावर, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला प्रकरणाची माहिती मी स्वत: घेतली आहे. आरोपींनी संघटनेचे संभाजी नाव का ठेवले, छत्रपती संभाजी महाराज नाव का नाही ठेवले, असा वाद करून शाईफेक केली. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून, आवश्यक ती कलमे लावण्यात येतील.