Pravin Darekar Criticism Uddhav Thackeray
मुंबई: भाजपावर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर टीका करून त्याच्याविषयी मळमळ ओकण्याचे काम ठाकरे शिवसेनेचे पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. सत्ता गेल्याचे वैषम्य त्यांच्या भाषणात दिसून आले. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील रामदास कदम, छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे अशा मोठ्या नेत्यांचा युज अँड थ्रो केला. आता स्वार्थासाठी त्यांना मराठी माणूस आठवला आहे. सत्तेसाठी स्वार्थीपणा दिसून येत आहे, अशी टीका भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी आज (दि.५) केली.
महाराष्ट्र सरकारने हिंदीला तिसरी भाषा म्हणून सक्ती करण्यासाठी काढलेले दोन जीआर रद्द केले. या पार्श्वभूमीवर शिवसेना (यूबीटी) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या दोन पक्षांनी संयुक्त विजयी मेळावा आज (दि.५) वरळी येथील एनएससीआय डोम येथे झाला. या मेळाव्यावर दरेकर यांनी निशाणा साधला आहे.
दरेकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना सन्मानीय राज ठाकरे असे बोलावे लागले यातच दिसून येते की आता त्यांना राज ठाकरे आठवायला लागले आहेत. कार्यकारी अध्यक्ष राज ठाकरे यांना नेमा तेव्हा ते जमले नाही. आज सन्मानीय बोलायची वेळ आली आहे. तेव्हा एक तिकीट किंवा पद राज ठाकरे यांना देण्यात आले नाही. राज ठाकरे यांना सन्मान देण्याची वेळी आली तेव्हा दिला नाही. आता त्यांच्याविषयी आलेले प्रेम हे पुतणा मावशीचे प्रेम आहे. आक्रमक आंदोलनाचा राजकीय हितासाठी वापर करणे चुकीचे आहे. उद्धव यांनी पंतप्रधान मोदी यांच्या शाळेविषयी काढले. त्यामुळे ते किती कोत्या मनाचे आहेत, हे दिसून आले. निवडणुका जवळ आल्याने मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, हा मुद्दा आता समोर आणला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. वांझोट्या झाडाला कोणी दगड मारत नाही. त्याप्रमाणे फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. पुढील राजकीय पेरणी करण्याचा प्रयत्न या मेळाव्यातून करण्यात आला आहे. फडणवीस यांचे उपकार लक्षात घ्या. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचे काम फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठी भवन उभे राहू शकले नाही. फडणवीस यांच्याविषयी कावीळ झाल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे.