मुंबई: राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर आमदार होणार का हे सोमवारी (दि. ३) निश्चित होणार आहे. बिहार मधील बाकीपूर या विधानसभा मतदारसंघात प्रशांत किशोर त्यांनीच स्थापन केलेल्या जनसुराज पक्षातर्फे पोटनिवडणुकीत उतरले आहेत.
भारतीय जनता पक्षाचा गड असलेल्या व राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या परंपरागत मतदारसंघात ते नशीब अजमावत आहेत. ते जिंकले तर तो त्यांचा विधिमंडळ राजकारणातील दमदार प्रवेश ठरेल.
भाजपचे नवे अध्यक्ष नितीन नवीन यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश घेतल्यानंतर राज्यसभेचे सदस्यत्व स्वीकारून बिहार विधानसभा बाकीपूरचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे, त्यात प्रशांत किशोर प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
सुमारे तीन लाख ४० हजार मतदार असलेल्या या विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने नितीन नवीन यांचे कार्यकर्ते नीरज सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे तर राष्ट्रीय जनता दलतर्फे लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी रेखा गुप्ता यांना मैदानात उतरवले आहे.
गेल्या पाच निवडणुकात या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. ते वर्चस्व मोडून काढण्यात प्रशांत किशोर यशस्वी होताहेत का याकडे राजकीय आणि विशेषतः निवडणूक रिंगणातील नियोजनकार वर्तुळाचे लक्ष लागले आहे.