मुंबई : महाराष्ट्रातील आघाडीची वृत्तवाहिनी ‘पुढारी न्यूज’च्या संपादकपदी वरिष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. दै. ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन योगेश जाधव यांच्या उपस्थितीत ‘पुढारी न्यूज’च्या मुंबई मुख्यालयात जोशी यांनी संपादकपदाची सूत्रे स्वीकारली.
प्रसन्न जोशी हे मराठी टीव्ही पत्रकारितेत 19 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. ‘स्टार माझा’, ‘जय महाराष्ट्र’, ‘साम टीव्ही’ व ‘एबीपी माझा’ अशा विविध वाहिन्यांत त्यांनी अँकर ते कार्यकारी संपादक अशा विविध जबाबदार्या सांभाळल्या आहेत. ‘बीबीसी वर्ल्ड’च्या ‘बीबीसी मराठी’ या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठीही त्यांनी दिल्लीत काम केले.
प्रसन्न जोशी हे मराठी वृत्तवाहिन्यांचा चेहरा मानले जातात. त्यांची आक्रमक पत्रकारिता ही त्यांची विशेष ओळख आहेच; शिवाय कल्पक कार्यक्रम संकल्पना व निर्मिती ही त्यांची खासियत आहे. संपादकीय विभागातील कामासोबतच त्यांनी 2019च्या कोल्हापूर-सांगलीतील पूरस्थिती, राम मंदिर भूमिपूजन ते मंदिर लोकार्पण सोहळा, 2023 मधील राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांतील विधानसभा निवडणुका यांचे वार्तांकन केले आहे. गेल्या 20 वर्षांतील सर्वच लोकसभा व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी गावोगावी कार्यक्रमही केले आहेत. डिजिटल माध्यमात त्यांनी वेळोवेळी केलेले प्रयोग लक्षवेधक ठरले. महाराष्ट्र व भारताचे राजकीय-अर्थकारण, आंतरराष्ट्रीय संबंध हे त्यांच्या विशेष अभ्यासाचे विषय आहेत.