मुंबई : राज्यात सर्वसामान्यांची लूट होत असताना त्याचा फटका सत्ताधारी आमदारालाही बसला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या नावाचे बनावट लेटरहेड, खोटी सही आणि एआयच्या माध्यमातून हुबेहूब आवाज काढत त्यांच्या विकास निधीतून सुमारे 3 कोटी 20 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, अधिकार्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आल्याचे लाड यांनी बुधवारी विधान परिषदेत सांगितले.
विधान परिषदेत माहितीच्या मुद्द्याद्वारे आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या विकास निधीच्या बाबतीत झालेल्या फसवणुकीची माहिती सभागृहाला दिली. बीड जिल्ह्यातून कोणीतरी रत्नागिरी येथे पत्रव्यवहार करून आपल्या नावाचे बनावट लेटरहेड आणि खोटी सही करून 36 कामांच्या यादीचा समावेश केला होता. त्या पत्राच्या आधारे रत्नागिरी येथून 3 कोटी 20 लाखांचा निधी बीडमध्ये वर्ग करण्यात आला. त्या कामांसाठी पैसे वर्ग झाल्यानंतर रत्नागिरीचे जिल्हा नियोजन अधिकारी यांना काहीतरी गडबड असल्याची शंका आल्याने त्यांनी तपासणी सुरू केली.
त्यानंतर त्यांनी आपल्याशी संपर्क करून असा कोणताही निधी मंजूर केला आहे का, अशी विचारणा केली. मात्र, आपण कोणताही निधी दिला नसल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधित कागदपत्रे मागवण्यात आली असता बनावट लेटरहेड, खोट्या स्वाक्षर्या आणि एआयच्या माध्यमातून नक्कल केलेल्या आवाजाचा वापर करून निधी मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले.
‘मी प्रसाद लाड बोलतोय, आताच्या आता निधी वर्ग करा,’ अशी दमदाटी संबंधितांनी केल्याचे लाड यांनी सभागृहात सांगितले. ते कोण आहेत त्यांची नावे कळलेली आहेत. त्यामुळे सरकारने पोलिसांना आदेश देऊन चौकशी करून त्यांना अटक करावी, ते कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही लाड यांनी केली.
भाजप आमदार श्रीकांत भारतीय, उमा खापरे, निरंजन डावखरे यांनाही अशाप्रकारचा अनुभव आला आहे. मला स्वत:लाही सभापतिपद स्वीकारण्यापूर्वी अशाच प्रकारच्या फसवणुकीचा अनुभव आल्याचे सभापती राम शिंदे यांनी सांगितले; पण मी जागरूक असल्याने तत्काळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, असे सांगत हा प्रकार शासनाला आव्हान देणारा आहे. त्यामुळे शासनाने दखल घेऊन अशा घटना घडणार नाहीत यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे निर्देश सभापतींनी दिले.