Prabhadevi Ganesh visarjan accident File Photo
मुंबई

Mumbai Ganpati Visarjan 2026: मुंबईत विसर्जन मिरवणुकीत दुर्घटना: प्रभादेवीत भरधाव कार थेट गर्दीत घुसली, नेमकं काय घडलं?

KG मार्गचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान भरधाव आणि निष्काळजीपणे चालवलेली एक होंडा सिटी कार थेट मिरवणुकीत घुसल्याची घटना घडली.

मोहन कारंडे

Mumbai Ganpati Visarjan 2026

मुंबई : प्रभादेवी परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. KG मार्गचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान भरधाव आणि निष्काळजीपणे चालवलेली एक होंडा सिटी कार थेट मिरवणुकीत घुसल्याची घटना घडली. इंद्रा टॉवर, काकासाहेब गाडगीळ मार्ग परिसरात घडलेल्या या अपघातात चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभादेवी येथील KG मार्गचा राजाची विसर्जन मिरवणूक उत्साहात सुरू होती. इंद्रा टॉवर आणि काकासाहेब गाडगीळ मार्ग परिसरात नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याच वेळी पाठीमागून आलेल्या एका भरधाव होंडा सिटी कारच्या चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवत मिरवणुकीतील गर्दीला धडक दिली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात काही काळ एकच तारांबळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

जखमींवर रुग्णालयात उपचार

या अपघातात मिरवणुकीत सहभागी झालेले चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन जणांना तातडीने उपचारासाठी KEM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर दोन जखमींना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

कारचालक पोलिसांच्या ताब्यात

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून कार आणि तिचा चालक प्रणव राकेश अग्रवाल (वय २१) याला ताब्यात घेतले आहे. चालकाला वैद्यकीय तपासणीसाठी सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे.

पुढील कायदेशीर कारवाई सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून वातावरण शांत आहे. सध्या पोलीस जखमींचे सविस्तर जबाब नोंदवण्याचे काम करत आहेत, तसेच या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT