मुंबई : साकीनाका पोलिसांनी ड्रग्ज तस्करीची साखळी नेस्तनाबूत केली आहे. कर्नाटकच्या म्हैसूर येथील ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश केल्यानंतर गुरुवारी पवईतील एका दुकानात छापा मारून 21 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले.
जप्त केलेल्या ड्रगची किंमत सुमारे 44 कोटी रुपये इतकी आहे. एप्रिल महिन्यात काहीजण ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती साकीनाका पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या अधारे पोलिसांनी सादिक शेख आणि सिराज पंजवानी या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून दहा लाखांचे ड्रग्ज जप्त केले होते. त्या दोघांच्या चौकशीत त्यांनी ड्रग्ज काळुराम चौधरी याला दिल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी मिरारोड येथून काळुराम याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 15 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त केले.
या प्रकरणात सलीम शेख याला पाहिजे आरोपी दाखवले होते. त्याला वांद्रे येथून अटक केली. त्याने कर्नाटकच्या म्हैसूर येथील ड्रग्ज कारखान्याची माहिती दिली. पोलिसांचे पथक म्हैसूर जात तेथील गॅरेजच्या आड सुरू असलेल्या ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश केला.
साकीनाका पोलिसांनी कारवाई करून 281 कोटी 96 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच तिघांना अटक केली. तिघांना अटक करून मुंबईत आणण्यात आले. त्यांच्या चौकशीत त्यानी पवई येथील एका दुकानात ड्रग्ज ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार त्या दुकानात छापा टाकून 21 किलो 903 ग्रॅम एमडी जप्त केले.
कर्नाटकच्या म्हैसूर शहराातील एमडी ड्रग्ज कारखान्याचा साकिनाका पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी 381 कोटी 96 लाखांच्या एमडीसह एमडी ड्रग्ज बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. महत्त्वाचे म्हणजे चालू वर्षांतील एमडी ड्रग्ज तस्करीतील ही आतापर्यंत सर्वांत मोठी कारवाई होती.