Polytechnic admission 2026 file photo
मुंबई

Polytechnic admission 2026 : पॉलिटेक्निकमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिलचा बोलबाला

‘कॉम्प्युटर’पेक्षा ‘मशीन’, ‘कोडिंग’पेक्षा ‘इलेक्ट्रिकल’ आणि आयटीपेक्षा बांधकाम क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पवन होन्याळकर

एआयमुळे नोकऱ्यांचे स्वरूप बदलत असताना आणि कॉम्प्युटर क्षेत्रातील रोजगारासाठी प्रचंड स्पर्धा वाढत असूनही दहावीनंतरच्या करिअरचा ट्रेंड यंदा विद्यार्थ्यांनी पारंपारिक अभ्यासक्रमाला महत्व दिले आहे. ‘कॉम्प्युटर’पेक्षा ‘मशीन’, ‘कोडिंग’पेक्षा ‘इलेक्ट्रिकल’ आणि आयटीपेक्षा बांधकाम क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल दिसला आहे.

यंदाच्या पदविका अभियांत्रिकी प्रवेशात मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल या तीन पारंपरिक शाखांमध्ये तब्बल ५७ हजार १५४ निम्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. गेल्या वर्षीच्या तुलनेत या शाखांच्या प्रवेशात तब्बल ४ हजार ९४० विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. दुसरीकडे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमधील प्रवेश मात्र १ हजार ५३९ ने घटले आहेत.

यंदा १ लाख ४० हजार ९३९ दहावीच्या विद्यार्थ्यांनी पदविका अभियांत्रिकी प्रवेशासाठी अर्ज केला. यामध्ये ९३ हजार ५४२ मुले आणि ४७ हजार ३९७ मुली होत्या. यापैकी ७६ हजार २६६ मुलांनी तर ३८ हजार ३०७ मुलींनी यंदा प्रवेश घेतला आहे. विशेष म्हणजे ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या तब्बल ६ हजार ७९९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

राज्यातील ४४९ तंत्रनिकेतन संस्थांमध्ये यावर्षी १ लाख ३९ हजार १४७ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी १ लाख १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. गेल्या दहा वर्षातील हा उच्चांक आहे. यंदा ३१ हजार ९४५ जागा रिक्त राहिल्या आहेत.

एआय आणि आयटी क्षेत्रातील नोकरीच्या बदलत्या संधींमुळे संगणक शाखांकडे विद्यार्थ्यांची धाव सुरू असतानाच यंदाच्या पदविका अभियांत्रिकी प्रवेशात मात्र पारंपरिक अभियांत्रिकी शाखांनी पुन्हा आपली ताकद दाखवली आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगला तब्बल २३ हजार ४७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेत सर्व शाखांमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. त्यापाठोपाठ कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये १९ हजार ३६६, इलेक्ट्रिकलमध्ये १७ हजार ८३५ आणि सिव्हिलमध्ये १६ हजार २७२ प्रवेश झाले आहेत.

विशेष म्हणजे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल या तीन पारंपरिक शाखांमध्येच प्रवेशाच्या जवळपास निम्मा वाटा या शाखांचा आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेत २० हजार ४२३ मुले आणि २ हजार ६२४ मुली, अशा एकूण २३ हजार ४७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. गेल्या वर्षी मेकॅनिकलमध्ये २० हजार ५९३ प्रवेश झाले होते. म्हणजे यंदा या शाखेतील प्रवेशात २ हजार ४५४ विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे.

कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला यंदा १९ हजार ३६६ प्रवेश झाले. यामध्ये मुलींची संख्या १० हजार ४६७, तर मुलांची संख्या ८ हजार ८९९ आहे. मात्र गेल्या वर्षीच्या २० हजार ९०५ प्रवेशांच्या तुलनेत यंदा कॉम्प्युटर शाखेतील प्रवेश १ हजार ५३९ ने घटले आहेत.

पुण्यात सर्वाधिक प्रवेश

पुणे विभागात सर्वाधिक १२९ तंत्रनिकेतन संस्था असून येथे ४२ हजार १११ जागांपैकी ३५ हजार ५४ प्रवेश झाले आहेत. त्यामुळे ७ हजार ५७ जागा रिक्त राहिल्या आहेत. नाशिक विभागात १०१ संस्थांमधील ३३ हजार ३३१ जागांपैकी २४ हजार ६४५ प्रवेश झाले असून ८ हजार ६८६ जागा रिक्त आहेत. छ. संभाजीनगर विभागात ८१ संस्थांमध्ये २५ हजार २८५ जागा असून १७ हजार ६२९ प्रवेश झाले. येथे ७ हजार ६५६ जागा रिक्त राहिल्या आहेत.

नागपूर विभागात ५४ संस्थांमध्ये १४ हजार ४५५ जागांपैकी १० हजार ७२८ प्रवेश झाले असून ३ हजार ७२७ जागा रिक्त आहेत. मुंबई विभागातील ६३ संस्थांमध्ये १८ हजार ४५७ जागांपैकी १४ हजार ६३० प्रवेश झाले असून ३ हजार ८२७ जागा रिक्त आहेत. अमरावती विभागात २१ संस्थांमध्ये ४ हजार ५१६ प्रवेश झाले असून ९९२ जागा रिक्त आहेत.

  • आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंगमध्ये ६ हजार ८१५, माहिती तंत्रज्ञानात ४ हजार २९४, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये ३ हजार ७८ आणि कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये २ हजार ५२८ प्रवेश झाले आहेत. विशेष म्हणजे एआय अँड मशीन लर्निंगमध्ये ३ हजार ५०८ मुलींनी, तर ३ हजार ३०७ मुलांनी प्रवेश घेतला आहे.

यंदा कोणत्या शाखेला किती प्रवेश?

  • अभ्यासक्रम -मुले -मुली -एकूण प्रवेश

  • मेकॅनिकल इंजिनिअरिंग -२०,४२३ -२,६२४ -२३,०४७

  • कॉम्प्युटर इंजिनिअरिंग -८,८९९ -१०,४६७- १९,३६६

  • इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग -१४,२०७ -३,६२८ -१७,८३५

  • सिव्हिल इंजिनिअरिंग- १२,०१७ -४,२५५ -१६,२७२

  • इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्यु.- ५,४८६ -३,७०७- ९,१९३

  • एआय अँड मशीन लर्निंग -३,३०७ -३,५०८ -६,८१५

  • इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी -२,०२०- २,२७४ -४,२९४

  • कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी -१,२५३ -१,८२५ -३,०७८

  • कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग -१,१५६ -१,३७२ -२,५२८

  • मेकॅट्रॉनिक्स -९६० -४६१ -१,४२१

  • इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर- ७७२ -५६१ -१,३३३

  • ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग -९२३ -१४७ -१,०७०

  • एआय -४९५ -४८९ -९८४

  • केमिकल इंजिनिअरिंग- ५९८ -२३६ -८३४

  • ऑटोमेशन अँड रोबोटिक्स -३९२ -२०३ -५९५

राज्य तंत्रशिक्षण मंडळाने पारंपरिक अभ्यासक्रमांचे अद्ययावतीकरण करताना उद्योगांना आवश्यक कौशल्यांचा समावेश केला आहे. अद्ययावत प्रयोगशाळा, नाविन्यपूर्ण विषय आणि ‘उत्कृष्टता केंद्रां’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारे प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. प्रवेशातील वाढ ही या बदलांना विद्यार्थ्यांनी दिलेली पावती आहे.
चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री
थेट रोजगाराच्या उपलब्ध संधी, उद्योगांशी वाढलेला समन्वय आणि विविध क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळाची वाढती मागणी यामुळे पॉलिटेक्निककडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. अभ्यासक्रमातील बदलांपेक्षा त्यातून उपलब्ध होणाऱ्या प्रत्यक्ष करिअरच्या संधी विद्यार्थ्यांच्या पसंतीत महत्त्वाच्या ठरत आहेत.
डॉ. प्रमोद नाईक, संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT