मुंबई : मुंबई शहरात अनेक मोठी मैदाने असताना राजकीय पक्षांची दादर येथील शिवाजी पार्कला (छत्रपती शिवाजी महाराज उद्यान) सर्वाधिक पसंती आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या जाहीर सभा या मैदानात व्हाव्यात, यासाठी दोन्ही शिवसेना,भाजप, मनसेने मैदान मिळवण्यासाठी अर्ज केले आहेत.
दादरच्या शिवाजी पार्क मैदानाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या सभेमुळे विशेष महत्त्व आले आहे. या मैदानात आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या जाहीर सभा झाल्या आहेत. अशा सभा गाजवणार्या मैदानावर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या जाहीर सभा व्हाव्यात, यासाठी ठाकरे गटासह शिवसेना, भाजपा, मनसे प्रयत्नशील आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या दादर जी उत्तर विभागात अर्जही करण्यात आले आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीचे मतदान 15 जानेवारीला होणार असल्यामुळे 13 जानेवारीला सायंकाळी साडेपाच वाजता प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेनेसह भाजप व मनसेने 10 ते 13 जानेवारीसाठी मैदान उपलब्ध व्हावे यासाठी अर्ज केल्याचे पालिकेच्या जी उत्तर विभागाकडून सांगण्यात आले. मात्र मैदान उपलब्ध करून देणे मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत नसल्यामुळे हे सर्व अर्ज राज्याच्या नगर विकास विभागाला पाठवण्यात येणार आहेत. 11, 12, 13 जानेवारीला मैदान उपलब्ध करण्यासाठी शिवसेनेकडून अर्ज करण्यात आल्याचे शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी सांगितले. या मैदानावर भाजपा-शिवसेनेची संयुक्त जाहीर प्रचारसभा होणार आहे. यावेळी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे वरिष्ठ नेते, शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्य नेते उपस्थित राहणार आहेत.
वर्षभरात 45 दिवस मैदान उपलब्ध करता येते
शिवाजी पार्क 365 दिवसांपैकी 45 दिवस राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी देता येते. यातील 9 दिवस मैदान कोणाला द्यायचे हे राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडून ठरवण्यात येते. तर उर्वरित दिवशी मुंबई महापालिका मैदान उपलब्ध करून देते. मात्र नगर विकास विभागाची परवानगीही घेण्यात येते. तशी रितसर परवानगी नगर विकास विभागाकडून घ्यावी लागते. उदाहरणार्थ 26 जानेवारी, 15 ऑगस्ट रोजी होणार्या शासकीय कार्यक्रमाला नगर विकास विभाग परवानगी देते.