Police injured in bike collision during blockade
नाकाबंदीदरम्यान बाईकच्या धडकेत पोलीस जखमी Pudhari File Photo
मुंबई

नाकाबंदीदरम्यान बाईकच्या धडकेत पोलीस जखमी

करण शिंदे

नाकाबंदीदरम्यान बाईकची धडक लागून पोलीस हवालदार जखमी झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अपघाताची नोंद करुन बाईकस्वारासह तिघांना अटक केली आहे. संदीप शंकर पवार, समीर सुरेश जाधव आणि दिपक तुकाराम पवार अशी या तिघांची नावे असून त्यांना रविवारी (दि.21) दुपारी वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.

रामचंद्र सावंत हे एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी रात्री पोलिसांनी अंधेरीतील महाकाली गुंफा रोड परिसरात नाकाबंदी सुरु केली होती. यावेळी रामचंद्र सावंत यांच्यासह पोलीस हवालदार वाघमारे, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान उपस्थित होते. वाहनांची तपासणी करताना रात्री उशिरा एका बाईकवरुन तीन तरुण विनाहेल्मेट जाताना पोलिसांना दिसले.

त्यामुळे त्यांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला, मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन बाईकस्वाराने भरवेगात बाईक चालविण्याचा प्रयत्न केला. त्यात रामचंद्र सावंत यांच्या बाईकची धडक लागून ते जखमी झाले. पळून जाणार्‍या तिन्ही तरुणांना नंतर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांचे नाव संदीप पवार, समीर जाधव आणि दिपक पवार असल्याचे उघडकीस आले. यातील संदीप डिलीव्हरी बॉयचे काम करत असून अपघाताच्या वेळेस तोच बाईक चालवत होता. अपघातप्रकरणी गुन्हा दाखल होताच या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यांतील बाईक पोलिसांनी जप्त केल आहे.

SCROLL FOR NEXT